3.9 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

नितेश राणे हेच खंडणीखोर – परशूराम उपरकर 

माझ्या भानगडीत पडलात तर उघडा पाडेन… 

कणकवली : माझ्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप करणारे आमदार नितेश राणे हेच खरे खंडणीखोर आहेत. सांताक्रृझ पोलीस ठाण्यात त्‍यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तसेच माझ्या कुंडल्‍या काढण्याच्या भानगडीत राणेंनी पडू नयेत. त्‍यांच्या अनेक कुंडल्‍या माझ्याकडे आहेत. माझ्या कुंडल्‍या काढण्याचा प्रयत्‍न केला तर मी तुम्‍हाला साफ उघडा पाडेन असा इशारा,माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज दिला.येथील आपल्‍या संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार नितेश राणे यांनी केलेल्‍या आरोपांना त्‍यांनी उत्तर दिले. श्री.उपरकर म्‍हणाले, कणकवली मतदारसंघातील प्रत्‍येक कामात ठेकेदारांकडून टक्‍केवारी घेणं एवढंच काम आमदार नितेश राणे करत आहेत. राणेंच्या या टक्‍केवारीच्या राजकारणामुळे सर्व कामे निकृष्‍ट दर्जाची आहेत. करूळ घाट रस्ता गेले दहा महिने बंद आहे. त्‍या रस्त्याच्या ठेकेदाराकडूनही राणेंनी टक्‍केवारी घेतलीय. त्‍यामुळेच एवढे महिने घाटमार्ग बंद असूनही राणे गप्प आहेत. उपरकर म्‍हणाले, माझी मनसेतून हकालपट्टी झाल्‍याचा आरोप राणे यांनी केला आहे. वस्तुत: मी वर्षभरापूर्वीच मनसे पक्ष सदस्याच्या राजीनामा दिला होता. त्‍यामुळे पक्षातून हकालपट्टी होण्याचा विषयच येत नाही. या उलट शिवसेना पक्षातून बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंची जाहीरपणे हकालपट्टी केली होती हे राणेंनी विसरू नये. विकासकामांच्या अनुषंगाने माझे पूर्वीचे सहकारी आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत असतो. त्‍याच धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेत असतो. यातील कुठल्‍या भेटीत माझ्या पक्षप्रवेशाची चर्चा झाली याचे पुरावे नितेश राणे यांनी द्यावेत असे श्री.उपरकर म्‍हणाले. ते पुढे म्‍हणाले, पक्ष प्रवेशासाठी मी कुणाचेही उंबरे झिजवले नाहीत. पण काँग्रेसमध्ये प्रवेश करताना राणेंना किती काँग्रेस नेत्यांचे उंबरे झिजवावे लागले हे सर्वश्रृत आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांना वारंवार भेटूनही त्‍यांनी राणेंना भाजपमध्ये प्रवेश दिला नव्हता. एवढेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेत प्रवेश मिळेल म्‍हणून नारायण राणे, नितेश राणे दोन तास कणकवली बसस्थानकासमोर वाट बघत थांबले होते. पण दोहोंनाही या यात्रेत भाजप प्रवेश देण्यात आला नाही. नारायण राणेंना भाजप प्रदेश कार्यालयात तर नितेश राणेंना एका माजी आमदाराच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावरून राणेंनी आपली भाजपमधील कुवत ओळखावी.स्वत: खंडणीखोर आणि टक्‍केवारीवर राजकारण करणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी माझ्या कुंडल्‍या काढण्याच्या भानगडीत पडू नयेत. त्‍यांच्या आणि नारायण राणे यांच्या बऱ्याच कुंडल्‍या माझ्याकडे आहेत. त्‍या बाहेर काढल्‍या तर तुम्‍ही उघडे पडाल असा इशाराही श्री.उपरकर यांनी राणेंना दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!