किरण सामंत यांची फेसबुक पोस्ट व्हायरल ; काही वेळाने पोस्ट डिलीटही
रत्नागिरी – सिंधुदुर्गचा लोकसभेचा उमेदवार कोण ?
कणकवली | मयुर ठाकूर : मागील अनेक दिवस लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या उमेदवारीवरून तळकोकणात राजकीय शिमगा पाहायला मिळत होता. मात्र अलीकडेच काही दिवस किरण सामंत हे रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे लोकसभेचे उमेदवार असल्याची चर्चा होत होती. मात्र मंगळवारी (काल) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपणास पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर आपण निवडणूक लढणार आणि जिंकणार ….असा दावा केला होता. त्यानंतर किरण सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्ष घेईल तो निर्णय आणि पक्ष देईल तो उमेदवार, मात्र उमेदवार हा महायुतीचाच असेल आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल. असं वक्तव्य केलं होतं. तर दुसरीकडे किरण समंत यांची फेसबुक पोस्ट ही सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, माननीय नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरिता व अब की बार ४०० पार होण्याकरिता रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार – किरण सामंत.
त्यामुळे आता रत्नागिरी – सिंधुदुर्गचा लोकसभेचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे स्टेटस हे चर्चेचा विषय बनून राहिले आहेत. त्यामुळे आता रत्नागिरी – सिंधुदुर्गचा उमेदवार कोण असणार ? आणि अधिकृत नावाची घोषणा केव्हा होणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
किरण सामंतांकडून ती पोस्ट डिलीट
किरण सामंत यांनी आपल्या फेसबुक पेजवरजी पोस्ट केली होती. ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने काही वेळाने डिलीट केली. मात्र काही माध्यमातून ती पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.