एलसीबी पोलिसांकडून १,३०,००० रू. किंमतीच्या ६ मोटारसायकल जप्त
कोल्हापूर |यश रुकडीकर : वाढत चाललेल्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण लक्षात घेत कोल्हापूर पोलिसांनी गतीने तपास करत चोरांची धरपकड सुरू केली आहे. दि. ४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने २ मोटारसायकल चोरांना बेड्या ठोकल्या.त्यांच्याकडून १,३०, ०००किंमतीच्या ६ मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार बालाजी पाटील व सतीश जंगम यांना खबर मिळाली की दि.४ रोजी २ इसम चोरीच्या मोटारसायकल विकण्यासाठी दिंडनेर्ली फाटा, ता.करवीर तेथे येणार आहेत.माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून १)ऋषिकेश उर्फ गणेश उमेश पाटील,वय २५, रा.राधानगरी व २)अक्षय चंद्रकांत पाटील वय.२९, रा.शिरगाव,राधानगरी यांना विनानंबरप्लेट गाडीसह अटक केली.चौकशीअंती त्यांनी कब्जातील विनानंबरप्लेट स्प्लेंडर मोटारसायकल ही साथीदार सुहास नामदेव चव्हाण, रा.राधानगरी यांच्यासमवेत चोरी केल्याचे सांगितले.त्यासोबतच त्यांच्याकडे चोरी केलेल्या आणखी ५ मोटारसायकल असल्याचे त्यांनी कबूल केले.सदर आरोपींकडून गुन्ह्यात १,३०,००० किंमतीच्या ६ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहा.पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे ,बालाजी पाटील,सतीश जंगम,वसंत पिंगळे,अमित मर्दाने,कृष्णात पिंगळे,संजय हुंबे यांनी केली आहे.