वाहनचालकांमधून तीव्र नाराजीचा सूर
कणकवली : कणकवली – हळवल – कळसुली मार्गावर हळवल फाटा येथील तीव्र वळणावर मोठं मोठे खड्डे पडले होते. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तात्काळ ते खड्डे बुजवले जातील असे कळविले होते. त्यानंतर हळवल ग्रामस्थांच्यावतीने उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू यांना निवेदन दिले होते.
त्यानुसार श्रीम. प्रभू यांनी ठेकेदार निनाद विखाळे यांच्याकडे सदर कामाचा ठेका आहे. तसेच मेंटेनन्स देखील त्यांच्याकडे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी निनाद विखाळे यांना सदरचे खड्डे बुजवून मार्ग वाहतुकीस सुरळीत करा अशी सक्त सूचना केली होती. मात्र एवढ करून देखील विखाळे यांनी त्या ठिकाणच्या खड्ड्यांमध्ये लाल माती टाकून खड्डे बुजवले. मात्र गुरुवारी झालेल्या पावसाने तेथील माती पूर्णपणे वाहून गेली आणि तेथील परिस्थिती पुन्हा जैसे थेच बनली.
मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तेथील खड्डे बुजवण्यासाठी काँक्रिटिकरण करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित ठेकेदाराने त्याला केराची टोपली दाखवून त्याठिकाणी माती टाकून खड्डे बुजवणे व अधिकाऱ्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली. या प्रकारामुळे नागरिक व वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.