शिवरायांसाठी शंभर गुन्हे घेण्याची आमची तयारी ; परशूराम उपरकर
कणकवली : बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करावा. शिवरायांसाठी शंभर गुन्हे घेण्याची माझी तयारी आहे असे प्रतिआव्हान माजी आमदार परशूराम उपरकर यांनी आज दिले. तर पुतळा दुर्घटनेनंतर कार्यकारी अभियंता पसार आहेत. असे असताना जावक क्रमांक घालून अधीक्षक अभियंत्याना पत्र कुणी लिहिले आणि त्यावर सर्वगोड यांची सही कशी असा सवालही श्री.उपरकर यांनी केला. येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी आणि त्याअनुषंगाने झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार आम्ही उघड केला. त्यामुळे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी असे पत्र अधीक्षक अभियंता छाया नाईक यांना लिहिले आहे.
बांधकाम खात्याने माझ्यावर जरूर गुन्हे दाखल करावेत. शिवरायांसाठी वेळ पडली तर आम्ही शंभर गुन्हे अंगावर घेण्यासाठी तयार आहोत. ते म्हणाले, पुतळा उभारणी, मोदींच्या दौऱ्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करून उभारलेले हेलीपॅड आदींमधील भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्यासाठी माहिती अधिकारात बांधकाम खात्याकडे ६० अर्ज केले आहेत. परंतु या अर्जांवर अभियंता सर्वगोड यांनी कधी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही राज्य माहिती अधिकाऱ्यांकडे किमान २५ अपिले दाखल केली आहेत. सर्वगोड यांना रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरण कामाची निविदा काढण्याचा अधिकार नाही. तरीही त्यांनी निविदा काढली आणि आपल्या मर्जीतील पनवेल येथे ठेकेदाराला निविदा मंजूर केली. प्रत्यक्षात हे काम येथील ठेकेदार शिरगावकर यांनी केले. उपरकर म्हणाले बांधकामचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता हे अधिकारी सर्वगोड यांना पाठीशी घालत आहेत.
चुकीच्या पद्धतीने त्यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. गणपतीत आजही सर्व रस्ते खड्डेमय आहेत. काम करायची कॅपॅसिटी नसलेल्या ठेकेदारांना सर्वगोड कामे देतात. नौदल यांच्याकडून दिलेल्या पत्रात पुतळा कोसळला त्या कामाची वर्क ऑर्डर मध्ये कोणतीही रक्कम नाही. देखभाल दुरुस्ती ३ महिने आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकामाचे पैसे असल्याने त्या कामाची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकामची आहे. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे . असा इशारा श्री. उपरकर यांनी दिला. दरम्यान काल जिल्हा न्यायालयात ६६/२४ या क्रमांकाने सर्वगोड यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहेत. सर्वगोड यांची माहिती उच्च न्यायालयात पुरावे सादर केले जाणार आहे. किल्ल्याची बांधणी सीआरझेडची परवानगी न घेता काम केले. राजकोट किल्ला येथील छत्रपतींच्या पुतळ्याची ६ फुटाची परवानगी असताना २८ फूट कोणी केला? निविदेच्या तारखांमध्ये तफावत आहेत. त्याविरुध्द कोर्टात जाणार असल्याचा इशारा श्री. उपरकर यांनी दिला.