मोती तलावात दुर्दैवी प्रसंग घडल्याने नारळ अर्पण करण्याचा कार्यक्रम स्थगित
सावंतवाडी : सावंतवाडी संस्थान काळापासून नारळी पौर्णिमेला मोती तलावात श्रीफळ अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे. मात्र,सोमवारी झालेल्या एका दुदैवी प्रसंगामुळे मोती तलावात नाळ अर्पण करण्यात आले नाही. दरम्यान, प्रथेप्रमाणे राजघराणे व पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते मानाच्या नारळाचे राजवाडा येथे विधिवत पूजन करण्यात आले. येत्या एक ते दोन दिवसात हा मानाचा नारळ मोती तलावात विधीवत अर्पण करण्यात येणार आहे.
सावंतवाडी संस्थान काळापासून नारळी पौर्णिमेला सावंतवाडी मोती तलावात नारळ अर्पण करण्याची परंपरा सुरु आहे. सावंतवाडी पोलीस मुख्यालयात मानाच्या नारळाचे पुजन करुन सायंकाळी मिरवणुकीने सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर आणला जातो. तेथे राजघराण्याद्वारे त्याची पुजा केल्यानंतर ते श्रीफळ मोती तलावात अर्पण करण्यात येते. यावेळी मोठ्या संख्येने सावंतवाडीकर नागरिक मोती तलावाच्या काठावर उपस्थित असतात.
दरम्यान, सोमवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशीच मोती तलावात सकाळीच एका तरुणाने उडी घेतली आहे आणि त्याचा मृतदेह शोध घेऊनही संध्याकाळपर्यंत सापडला नव्हता. त्यामुळे राजघराण्याचे राजपुरोहित यांनी आज मोती तलावात श्रीफळ अर्पण करण्यात येणार नसल्याचे म्हटले. त्यानुसार राजघराण्यातर्फे युवराज लखमराजे भोंसले व सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी श्रीफळाचे विधीवत पूजन केले आणि हे श्रीफळ राजवाड्याच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ठेवले आहे.
मोती तलावातील मृतदेह सापडल्यानंतर एक-दोन दिवसात हे श्रीफळ मोती तलावात अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती युवराज लखमराजे भोसले यांनी दिली.