विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांना आ. नितेश राणेंनी सुनावले खडे बोल
वैभववाडी : वैभववाडी बसस्थानक समस्यांच्या गर्तेत असताना या स्थानकाबाबत तुमची इतकी उदासीनता का ? सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र आपण जबाबदार अधिकारी असून देखील बेजबाबदारपणे वागत आहात. जिल्ह्यात काम करण्याची तुमची मानसिकता नसेल तर राजीनामा द्या. पण जिल्ह्याची वाट लावू नका. असे खडे बोल राज्य परिवहन महामंडळ विभाग सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांना आमदार नितेश राणे यांनी सुनावले.
आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वैभववाडी बसस्थानक प्रलंबित प्रश्न व प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत बैठक घेतली. व बसस्थानक परिसराची पाहणी केली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, नागराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, वैभववाडी महिला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, नगरपंचायत बांधकाम सभापती विवेक रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, नगरसेवक प्रदीप रावराणे, अतुल सरवटे, प्रकाश सावंत, किशोर दळवी, बंड्या मांजरेकर, उद्योजक विजय तावडे व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभववाडी बसस्थानकाला दोन वाहतूक नियंत्रण तात्काळ द्या, मानव विकासच्या सर्व गाड्या तालुक्यात दिसल्या पाहिजेत, वैभववाडी ते मुंबई एसटी तात्काळ सुरू करा अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी पाटील यांना दिल्या. मानव विकास च्या सर्व गाड्या वैभववाडीला दिल्या जातील. दोन वाहतूक नियंत्रक तात्काळ देण्यात येतील असे आश्वासन अभिजीत पाटील यांनी बैठकी दरम्यान दिले आहे.
बरेचसे विषय हे तुमच्या अखत्यारीत आहेत. परंतु तुमची मानसिकता काम करण्याची नाही. तुमच्यामुळे प्रशासनाची बदनामी होत आहे. हे प्रकार तात्काळ थांबले पाहिजेत असा सज्जड दम आमदार नितेश राणे यांनी त्यांना दिला.
बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी जागा तात्काळ उपलब्ध करून द्या. शौचालय व इतर दोन रूमची साफसफाई तात्काळ करा. सुविधा देण्यात तुम्ही कमी पडता. परंतु त्याचा सर्व रोष आमच्यावर येतो. यात आमचा काय दोष. असे राणे यांनी सुनावले. चालू परिस्थिती तुम्हाला बदलावीच लागेल. सरकार महायुतीच असले तरी जनतेच्या हिताचे प्रश्न विचारतच राहणार असे नितेश राणे यांनी सांगितले. बसस्थानकातील रंगरंगोटी, बसस्थानक बॅनर व पाण्याची सुविधा हे विषय स्थानिक व्यापारी, युवक व रोटरी क्लब ने सोडविले आहेत. या कामासाठी प्रशासनाने एक रुपया देखील खर्च केला नाही. मानव विकास च्या गाड्या केवळ तालुक्याला असताना हे बाहेर धंदा करत आहेत. असा आरोप प्रमोद रावराणे यांनी केला.
यावेळी दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, संजय सावंत यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे हे या ठिकाणी चांगली सेवा देत आहेत. त्यांच्यामुळेच तुमचा बराचसा भार हलका होत आहे. गुरखे यांना वैभववाडी स्थानकातच नियुक्ती द्या असे आमदार नितेश राणे यांनी पाटील यांना सांगितले.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी बस स्थानक इमारतीची पाहणी केली. तसेच करण्यात येणाऱ्या प्रवासी बैठक शेड कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांनी केला. विभाग नियंत्रक पाटील यांच्या कामात सुधारणा न झाल्यास तसेच त्यानी जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असे नितेश राणे यांनी सांगितले.