माजी आ. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत केलेल्या आंदोलनात अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : लक्झरी बसमधून मालवाहतूक, गोवा बनावटीची दारू वाहतूक, अमली पदार्थ, सोने आणि गोमांस वाहतूक होत असल्याचा आरोप करत त्यावर कारवाई व्हावी. या मागणीसाठी आज माजी आ. परशुराम उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली वाहनचालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच आरटीओ यांना याबाबत जाब विचारला. दरम्यान आरटीओ यांनी आपल्या परीने योग्य ती कारवाई सुरू असल्याचे सांगत कारवाई केलेल्या आलेखही आंदोलनकर्त्यांच्या समोर ठेवत आरटीओ विभाग अशा वाहनांवर कारवाई करत असल्याचे स्पष्ट केले.
लक्झरी बसमधून होत असलेली मालवाहतूक, विनापरवाना वाहतूक आदी विविध समस्यांसह गणेश चतुर्थी सणात चाकरमानांना त्रास होऊ नये, म्हणून खासगी आराम बसकडून कमी दरात भाडे आकारणी, खासगी बसमधून होत असलेली दारू वाहतूक व अमली पदार्थ वाहतूक, सोन्याची होत असलेली तस्करी, गोमांस तस्करी अशा विविध प्रश्नांबाबत माजी आ. परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वाहनचालकांनी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन छेडले. त्यानंतर त्यांनी आरटीओ विजय काळे आणि सहाय्यक आरटीओ नंदकिशोर काळे यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने खासगी बस मधून अमली पदार्थ आणि गोमांस वाहतूक होत असून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे सांगत त्यावर आरटीओ विभाग कारवाई का करत नाही असा प्रश्न उपरकर यांनी केला. तसेच दारू वाहतूक, जादा भाडे, माल वाहतूक करणाऱ्या बसवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान आपल्या विभागाकडून माल वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस वर कारवाई केली जात आहे. मात्र गोमांस वाहतूक होत असल्याचे अद्यापतरी निदर्शनास आलेले नाही. मात्र तसे कोठे आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी आरटीओ काळे यांनी दिली.
दरम्यान आरटीओ विभागाकडे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असतानाही हा विभाग चांगले काम करत आहे. ओव्हरलोड वाहतूक प्रकरणी एप्रिल ते जुलै अखेर १२२३ वाहने तपासण्यात आली. ६७ वाहनांवर कारवाई केली असून २२ लाख ३३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. काळया काचा, लायसन्स नसणे, पीयूसी नसणे, हेल्मेट नसणे, मद्यापी वाहन चालक आदींवर कारवाई केली जात असल्याचे आरटीओ विजय काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.