११ ऑगस्ट रोजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि आ. नितेश राणे यांच्या हस्ते होणार वितरण
कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून युवा संदेश प्रतिष्ठानच्या तज्ञ कमिटी मार्फत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता शालेय विद्यार्थी, पालक, शालेय परिसरातील ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
सन २०२४ यावर्षांसाठी निवड जाहीर करण्यात येत आहे. माध्यमिक विभाग प्रविण प्रभाकर कुबल, रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी भूतनाथ, ता. मालवण प्राथमिक विभाग विजय धर्मराज मस्के, जि प प्राथमिक शाळा तुळस, वडखोल, ता. वेंगुर्ले यांची निवड करण्यात आली आहे.
सदर शिक्षकांना रविवार ११ ऑगस्ट २०२४ रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे होणार्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा (STS)बक्षिस वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ७ वे वर्ष असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कारमूर्तींचे संजना संदेश सावंत माजी जि. प.अध्यक्ष सिंधुदुर्ग आणि संदेश उर्फ गोट्या सावंत संस्थापक अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.