सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथील न्यायालयात नेत असताना बांगलादेशी आरोपी पोलिसांना हुलकावणी देत पळून गेल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. अखेर इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सायंकाळी पकडण्यात आले. शनिवारी दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यासाठी नेलेल्या बांगलादेशी आरोपीने लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगत तेथून पालायन केले होते. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती.
दरम्यान, सायंकाळी उशिरा इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी राकेश चव्हाण, मयुरेश कमतनुरे, संजय हुंबे, नरेश कुडतरकर यांना संशयित महामार्गवरून लपतछपत येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच त्याचा पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेतले. बांदा पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपी पुन्हा सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
काही वर्षांपूर्वी सावंतवाडी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केलेल्या ज्ञानेश्वर लोकरे च्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले होते. पोलिसांना चकवून हा बांगलादेशी आरोपी हातोहात निसटला होता. या घटनेमुळे सावंतवाडीतील पोलीस यंत्रणा कामाला लागली. मात्र, अखेर इन्सुली येथे सदरचा आरोपी पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यात आल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.