जिल्हाधिकारी व सावंतवाडीचे उपवनरक्षक यांच्यासमवेत बैठक घेऊन केल्या सूचना
स्थानिक व्यवसायिकांनी आ. वैभव नाईक यांचा सत्कार करत मानले आभार
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सिंधुदुर्गात खाजगी मालकीच्या जमिनीतील भेडले माड या झाडाच्या फांद्या तोडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवर वनविभागाकडून कारवाई होत आहे. त्यांच्यावर लाखोंचा दंड आकारला जात आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यासमवेत सावंतवाडीचे उपवनरक्षक एस. एन. रेड्डी यांची बैठक घेत याकडे लक्ष वेधले. शासकीय वन विभागाच्या जंगलातील झाडांची तोड होत असेल तर जरूर कारवाई करावी. परंतु खाजगी मालकीच्या जमिनीतील भेडले माड झाडांच्या फांद्या तोडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांवर कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार नाही.त्यामुळे वनविभागाकडून होत असलेली कारवाई चुकीची असून ती तात्काळ थांबविण्याची सूचना आ. वैभव नाईक यांनी केली. त्यावर सदर कारवाई थांबविण्याचे एस. एन. रेड्डी यांनी मान्य केले. तसेच पुणे फुलमार्केट येथे भेडले माडाची पाने खरेदी करण्याबाबत वनविभागाने पत्रव्यवहार केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी या प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून दिल्याबद्दल भेडले माडाच्या पानांचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी आज आमदार वैभव नाईक यांचा कुडाळ शिवसेना शाखा येथे सत्कार करत आभार मानले. हि कारवाई थांबविण्यासाठी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, रुपेश राऊळ, ऍड सुधीर राऊळ यांनी पाठपुरावा केला होता.
या सत्कारावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शैलेश विर्नोडकर, लवु नाईक, सुशांत सावंत,सखाराम परब,विजय परब,बाळकृष्ण नळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.