बुधवारी चौथा व पाचव्या टप्प्यातील ७१५ शिक्षकांचे होणार बदलीसाठी समुपदेशन
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अंतर्गत जिल्हा बदली प्रक्रियेसाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या समुपदेशनासाठी अर्ज केल्यानुसार बोलावण्यात आलेल्या २४५ शिक्षकांमधून १२९ शिक्षकानी सोयीची शाळा मिळत असल्यामुळे प्रतिसाद दिला. त्यामुळे या शिक्षकांचा पसंतीच्या शाळेत बदलीचा मार्ग मोकळा झाला. ८० शिक्षकांनी पसंतीची शाळा मिळत नसल्यामुळे बदलीस नकार देत मूळ शाळेत राहणेच पसंत केले ३६ शिक्षक उपस्थित राहिले नाहीत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मकरंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन प्रक्रिया पार पडली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, शिक्षक आदी उपस्थित होते.
मंगळवारी व बुधवारी या दोन दिवशी अंतर्गत जिल्हा बदलीसाठी समुपदेशन प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाने हाती घेतली आहे. आज मंगळवारी पहिला दुसरा व तिसरा अशा टप्प्यातील बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलवण्यात आले होते. या अर्जांमधील 36 शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे उपस्थित राहिलेल्या २०९ शिक्षकांची जाहीर केलेली रिक्त शाळांची यादी दाखवून बदलीसाठी पसंतीची शाळा निवडण्याची संधी देण्यात आली. सेवा जेष्ठता यादीप्रमाणे प्रत्येक टप्प्यामधील बदली पात्र शिक्षकांना ही संधी देण्यात आली. त्यानुसार १२९ शिक्षकांनी पसंतीचे शाळा मिळत असल्याने बदलीसाठी आपली शाळा निश्चित केली व या बदली प्रक्रियेस होकार दिला. तर उपस्थित राहिलेल्या ८० शिक्षकाना पसंतीची शाळा नसल्याने त्यांनी या बदली प्रक्रियाच नकार देत मूळ शाळेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या तीन टप्प्यातील या बदल्यांमध्ये गंभीर आजारी विधवा पती-पत्नी एकत्रीकरण अनेक वर्षे दुर्गम भागात काम करणारे शिक्षक यांचा समावेश होता.
उद्या बुधवारी चौथ्या व पाचव्या टप्प्यामधील बदल्यासाठी प्रक्रिया होणार आहे. या टप्प्यात ७१५ शिक्षक असून रिक्त शाळांच्या यादीनुसार त्यांना पसंतीची शाळा निवडण्याची संधी आहे. चौथ्या टप्प्यामध्ये दहा वर्ष एका तालुक्यात काम केलेले शिक्षकांचा समावेश आहे पाचव्या टप्प्यात विनंती अर्ज केलेले शिक्षक आहेत.