सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : विधानसभा निवडणूक जवळ येवू लागल्यावर सर्वच राजकीय पक्ष जागृत झाले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. त्यानुसार सत्ताधारी भाजप पक्षाने सुद्धा जनतेत जावून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात असून या तीन दिवशी जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघासाठी ‘ जनता दरबार ‘ घेणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील समस्याग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविल्या जाणार आहेत.
याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या जिल्हा दौऱ्यात आणि मुंबई येथील कार्यालयात जिल्ह्यातील नागरिकांकडून अनेक निवेदने देण्यात येतात. ज्यात नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातील छोट्या छोट्या समस्यांचा समावेश असतो. पालकमंत्री कार्यालयाकडून याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जातो. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे असे प्रश्न तडीस जात नाही. विशेषतः नागरिकांच्या महसुली, आरोग्य अशा कामांमध्ये यंत्रणेचे वेळकाढू धोरण आडवे येते. यावर्षात आचारसंहितेची, कर्मचारी कमी असल्याची कारणे देत नागरिकांना अनेक साध्या साध्या प्रश्नांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार हे सामान्य लोकांना दिलासा देणारे, त्यांच्या सुसह्य जगण्याप्रती कटिबद्ध सरकार आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केलेले आहे. त्याला सुशासनाची जोड गरजेची आहे.
जिल्ह्यातील नागरिकांच्या महसुली, आरोग्यविषयक आणि अनेक प्रलंबित समस्यांना गती देण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी १२, १३, १४ ऑगस्ट या तीन तारखांना अनुक्रमे कणकवली, कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी या तीन मतदरसंघातील नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन केलेले आहे. यावेळी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांची परिपूर्ती करणार आहेत. तरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आपापल्या प्रलंबित समस्यांचे एक तपशीलवार निवेदन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय सिंधुदुर्गनगरी, आ. नितेश राणे यांचे कार्यालय कणकवली, नीलेश राणे यांचे कार्यालय मालवण-कुडाळ आणि राजन तेली यांचे कार्यालय सावंतवाडी तसेच सर्व तालुका भाजपा कार्यालये या ठिकाणी दोन प्रतीत आणून द्यावीत. संबंधित तारखांना आपल्याला उपस्थित राहण्यासाठी स्थळ आणि वेळ कळविली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.