आरोग्य विभागाची पतके तैनात : सहकार्याची आवश्यकता
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी
सिंधुदुर्ग : हत्तीरोगामुळे मृत्यूचे प्रमाण शून्य असले तरी हत्तीरोग निर्मूलन व्हावे यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. सिंधुदुर्गात मालवण सोमवार पेठ येथे पहिला रुग्ण सापडल्यानंतर आणखी दोन रुग्ण भरड व गवंडी वाडा येथे सापडले आहेत. त्यामुळे आता मालवण शहरातील ३८२८ घरांमधील ४३५५ कुटुंबातील साडे तेरा हजार नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणीसाठी रक्त नमुने गोळा करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.
मालवण शहरातील ३ नागरिकांच्या रक्तात हत्तीरोग जंतू आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर या शहरातील नागरिकांच्या आजपासून सर्व्हे करण्यात येत असून १० पथकामार्फत ३८२८ घरातील ४३५५ कुटुंबातील साडे १३ हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. रात्री ८ ते १२ या कालावधीत त्यांचे रक्तनमुने घेतले जाणार आहेत. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या डीईसी गोळ्यांचा साठा ही उपलब्ध करून देण्यात आला आहे. रक्त नमुने हे रत्रीच्याच वेळी घेणे अवशक्य असल्याने नागरिकांनी रात्रीच्यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना रक्त नमुने घेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी पत्रकार परिषदेत केले.
हत्तीरोग पार्श्भूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ स्वप्नील बोधमवाड आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. धुरी म्हणाल्या की, मालवण शहरातील नागरिकांमध्ये हत्तीरोग जंतू आढळल्याने या तीनही रुग्णांना त्वरित प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू करण्यात आलेला आहे. तसेच खबरदारी म्हणून मालवण शहरातील सर्व १३ हजार लोकसंख्येचे हत्तीरोग सर्वेक्षण करण्याकरिता कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आज २६ जुलै पासून मालवण शहरात दहा विशेष पथकामार्फत रात्र कालीन रक्त नमुना सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. हे नमुने रात्री ८ ते १२ या कालावधीत घेतले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन डॉ सई धुरी यांनी केले आहे.
२ वर्षा आतील आणि गंभीर आजारी व्यक्तींचे नमुने घेणार नाहीत
आज पासून रात्री ज्यांचे रक्त नमुने घेण्यात येणार असून त्यातून २ वर्षा आतील लहान मुले आणि जे नागरिक गंभीर आजारी आहेत अशा व्यक्तींचे रक्त नमुने घेतले जाणार नसल्याचे डॉ सई धुरी यांनी सांगितले.
गोळ्यांचा साठा उपलब्ध
तब्बल दहा वर्षांनी पुन्हा हत्तीरोग रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी एक बैठक घेऊन आरोग्य यंत्रणा सक्रिय केली आहे. पहिला रुग्ण हा 65 वर्षीय महिला आहे दुसरा व तिसरा रुग्ण 58 वर्षाची महिला व 17 वर्षाची मुलगी आहे. या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. या तीनही रुग्णांना आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू झाला आहे. हत्तीरोग जंतू मारणारी डीईसी गोळ्या त्या तिन्ही रुग्णांना सुरू करण्यात आल्या आहेत. दिवसाला ३ गोळ्या असा १२ दिवसांचा हा कोर्स असणार आहे. पालघर येथून २२०० तर सीपीआर कोल्हापूर येथून ४०७८० एवढ्या गोळ्या जिल्ह्यात उपलब्ध झाल्या असल्याची माहिती डॉ सई धुरी यांनी दिली.