कणकवली : गेले काही दिवस वादळी वा-यासह मुसळधार कोसळणा-या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घराची छपरे, भिंती कोसळून अनेकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये अनेक ठिकाणी विजेच्या पोलांवर झाडे कोसळल्याने 2-2 दिवस विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक हैरान झाले आहेत. या नुकसानीचे पंचनामे तालुक्यात महसुल विभागामार्फत केले जात आहेत. असलदे उगवतीवाडी नजीक सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास देवगड – निपाणी रस्त्यावर आंब्याचे झाड पडून वीजेच्या तारा तुटल्या व वाहतूक ठप्प झाली होती.
तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट शाळेच्या इमारतीचे छप्पर पहाटेच्या वादळी पावसात कोसळून सुमारे 80 ते 90 हजाराचे नुकसान झाले आहे, तळेरे गावठाणवाडी येथील मनीषा मनोहर चव्हाण यांचे घरावर हेळ्याचे झाड कोसळून दिनांक 25 जुलै रोजी अंदाजे 51 हजारांचे नुकसान झाले आहे, लक्ष्मण बाबाजी कोकरे यांच्या घरावर झाड पडून सुमारे 10 हजार 950 रुपयांच नुकसान झाले, नरडवे येथील अरविंद निळकंठ मेस्त्री यांचे घरावर माड पडून अंदाजे 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच सांगवे येथील वैशाली चंद्रकांत राणे यांचे घरावर आंब्याचे झाड पडून अंदाजे 15 हजारांचे नुकसान झाले आहे, लोरे येथील हरिश्चंद्र महादेव मोसमकर यांच्या घरावर झाड पडून दिनांक 25 जुलै रोजी अंदाजे 65 हजार 800 रुपयांचे नुकसान एवढे झाले. वैशाली मनोहर राणे यांच्या घरावर झाड पडून 89 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठी वित्तहानी झाली आहे.