9.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

काळ झेपावला….अन् अज्ञात वाहनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला

सिंधुदुर्ग : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले. ही घटना राधानगरी – फोंडा राज्य मार्गावर अभयारण्य क्षेत्रातील मांढरेवाडी शेळप दरम्यान अपघात झाला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर – राणेवाडी येथील दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुजल चंद्रकांत राणे (वय – २० ) व सचिन चंद्रकांत राणे ( वय २३) असे त्यांचे नाव आहे. अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने त्यांच्या मृत्यू झाला, असल्याची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुजल व सचिन हे दोघे सख्खे भाऊ आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक ( एमएच ०७ एक्यू ९७४१ ) घेऊन कोल्हापूर येथे जाण्यासाठी घरातून बुधवारी सकाळी ६ वाजता बाहेर पडले. सचिन हा कोल्हापूर येथे एका हॉटेल मध्ये कामाला होता. पावसाने हाहाकार उडाला होता त्यामुळे ज्या हॉटेलमध्ये सचिन कामाला होता त्या हॉटेलमध्ये पाणी भरल्यामुळे ते हॉटेल बंद होते. ते दोघेही तेथे न थांबता माघारी परतले होते. आपल्या मूळ गावी निघाले असताना मांढरेवाडी शेळप दरम्यान असलेल्या ओढ्याजवळ आल्यावर त्यांच्या ताब्यातील दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. एवढेच नाही तर धडक बसलेले वाहन त्यांच्या डोक्यावरून गेलं असावे असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. त्याचे कारण म्हणजे दोन्ही भावांच्या डोक्याचा अक्षरशः हा चंदामेंदा झाला होता आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संततधार पावसात आणि जंगलमय भागात निर्जन स्थळी हा अपघात झाला. त्यामुळे घटनास्थळावर आसपास अन्य कोणतेही वाहन किंवा वर्दळ नसल्याने धडक देणाऱ्या वाहनाचा तसेच वाहन चालकाचा काही ठाणपत्ता लागला नाही. सुजल व सचिन यांचा मृतदेह राधानगरी येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. सदर घटनेची माहिती सुजल व सचिन यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. नातेवाईकांनी व गावातील नागरिकांनी तातडीने राधानगरी रुग्णालय गाठले व मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर गुरुवारी सुजल व सचिन यांचा मृतदेह त्यांच्या सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर – राणेवाडी येथील गावी आणण्यात आला. सुजल व सचिन यांच्या अपघाती मृत्यूने सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर – राणेवाडीसह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!