परशुराम उपरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष
कणकवली : सध्या महाराष्ट्रासह देशात चाललेल आयएएस पूजा खेडकर प्रकरण ताजे आहे. याच पार्श्वभूमीवर माजी परशुराम उपरकर यांनी देखील आता सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर प्रमाणपत्रांबाबत केंद्र व राज्य सरकारकडून तपासणी सुरु असून चुकीच्या पद्धतीने त्यांनी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ घेतला असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध खात्यातील सर्व दिव्यांग (अपंग) कर्मचारी आणि अधिकारी यांची दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच ते लाभ घेत असलेल्या शासनाकडील विविध सवलतींची तपासणी करण्यात यावी, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची शारिरीक तपासणी करुन त्यांना दिलेल्या अपंगत्वाच्या टक्केवारीची खातरजमा करुन घेण्याविषयी आपल्या जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. कारण त्यामुळे गैरमागनि अथवा वशिलेबाजी करुन किंवा खोटी प्रमाणपत्रे सादर करून शासनाच्या दिव्यांग आयकर प्राप्तीकर व नोकरीतील विविध सवलतींचा गैरफायदा घेणाऱ्यांवर वचक बसून शासनाच्या निधीचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. या विषयी काही अधिकारी व कर्मचारी यांची सेवेत लागल्यापासून खातेस्तरावर पुन्हा तपासणी झाली नसल्याचे समजते. तरी याच्यातच आपल्याकडून उचित आदेश व कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती. तसेच नव्याने अपंग कोट्यातून नोकरीवर रुजू झालेले शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांच्याही प्रमाणपत्रांची व शारिरीक तपासणी करणे आवश्यक आहे.
त्यामुळे आता सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी या निवेदनाद्वारे खरोखरच पडताळणी व शारीरिक तपासणी लावणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.