नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर अचानक डाऊन झाले. त्याचा फटका जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात बसला. मग ती बँक सेवा असो की विमानसेवा, सर्वच काही ठप्प झाले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक सर्व्हर डाऊन झाले. संगणकाची स्क्रिन अचानक निळी झाली. बघता बघता रूग्णालय, एअरपोर्ट, न्यूज चॅनेल, शेअर मार्केट सगळ्याच ठिकाणी संगणकाची स्क्रिन निळी झाली. हे फक्त भारतातच नाही तर संपुर्ण जगभरात अनुभवायला भेटलं. याचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला. मायक्रोसॉफ्टला क्राऊडस्ट्राइक ही फर्म अडव्हान्स सायबर सिक्युरिटी देते. त्यांच्या अपडेटच्या गडबडीत हा सर्व प्रकार झाला आहे. याचा परिणाम मोठमोठ्या कंपन्यांवर झाला.
यानंतर जगभरातल्या बँका आणि एअरलाईन्स यांना याचा फटका बसला. शिवाय मायक्रोसॉफ्टच्या युजर्सलाही याचा त्रास सहन करावा लागला. हा बिघाड का निर्माण झाला हे नंतर समोर आले. मायक्रोसॉफ्टने तांत्रिक बिघाड झाल्याचे मान्य केले. शिवाय त्यात लवकर दुरूस्ती करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याचा सर्वाधिक फटका हा जगभरातल्या वेगवेगळ्या एअर लाईन्सला बसला. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्येही परिणाम दिसून आले. भारतातही इंडिगो, स्पाईस आणि अकासा एअरलाइन्स यांनीही आम्हाला मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन झाल्याचा फटका बसला असल्याचे सांगितले.
दिल्ली विमानतळावर विमानसेवा प्रभावीत झाली. त्याच बरोबर मुंबई विमानतळावरही उशीराने सेवा होती. एअर इंडियाला ही याचा फटका बसला. स्पेनमध्येही विमान सेवेवर परिणाम झाला. तर इंग्लंडमध्ये स्काय न्यूजचे प्रक्षेपण बंद झाले. लंडनच्या शेअर मार्केटमध्येही परिणाम दिसून आला. ऑस्ट्रेलिया सरकारने तर तातडीची आपातकालीन बैठक बोलावली होती. अनेक विमानतळांवर गर्दी दिसून आली. बोर्डींग पास देण्यातही विमान कंपन्यांना त्रास होत होता. त्यामुळे काही ठिकाणी प्रवाशांच्या रागाचाही सामना करावा लागला.