8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला | दंड सत्ताधाऱ्यांनी मेडिकल कॉलेज कडे केलेल्या दुर्लक्षामुळे लागला ; परशुराम उपरकर

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला. त्यावेळी मेडिकल कॉलेजला आवश्यक असणारी जागा, मशिनरी इत्यादी बाबींची पूर्तता केल्यानंतरच कॉलेज चालू करा अशी मागणी आम्ही केली होती. परंतु त्यावेळी कॉलेजचे डीन श्री. मोरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून एफीडेव्हीट करून आम्ही सर्व निकष पूर्ण करतो असे सांगितले होते. मात्र अद्याप पर्यंत त्याची पूर्तता झाली नाही. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने महाराष्ट्र मधील काही मेडिकल कॉलेजला दंड केला आहे. त्यामध्ये रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजला बारा लाखाचा दंड केला आहे. हा दंड सत्ताधाऱ्यांनी मेडिकल कॉलेज कडे केलेल्या दुर्लक्षामुळे लागला असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे हे तिसरे वर्ष सुरू असून कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षकांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळत नाही. तसेच कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षक नसल्याने ते कॉलेज वैद्यकीय शिक्षण मंडळाकडे दिले आहे. असे असतानाही त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने १० ओपिडीचे पेशंट तपासणे गरजेचे असतानाही पूर्णता ओपीडी होत नाही. असे उपरकर यांनी सांगितले. मेडिकल कॉलेजला आवश्यक असणारी नियमाप्रमाणे २१ एकर जागा उपलब्ध नाही. फक्त नऊ एकर जिल्हा रुग्णालयाच्या जागेमध्येच कॉलेज सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान सत्ताधारी लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप श्री उपरकर यांनी केला. त्या कॉलेजच्या सध्याच्या वैद्यकीय शिक्षक भरती बद्दल विचारणा केली असता त्यांनी एमपीएससी च्या माध्यमातून जाहिरात दिली आहे .परंतु या कॉलेजमध्ये येण्यास कोणीही इच्छुक नसल्याचे सांगितले. परंतु या कॉलेजमध्ये कोणीही येण्यास इच्छुक नसेल तर त्यांना कशाप्रकारे कॉलेजमध्ये आणतात येईल यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणते प्रयत्न केले? असा सवालही श्री उपरकर यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. परंतु त्यांच्याजवळ पैसे नसल्याचे नुकत्याच झालेल्या डी पी डी सी बैठकी मधून समोर आले आहे. 200 कोटी रुपयांचा आराखडा करून फक्त 83 कोटी रुपये येतात तरीही राज्य सरकार घोषणा करत आहेत. या घोषणांचा एक भाग म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी तळेरे विजयदुर्ग रस्ता काँक्रिटीकरण करणार असे सांगितले होते. त्याचे भूमिपूजनही करण्यात आले होते .मात्र, त्या कामास अद्यापही सुरुवात केलेली नसल्याचे श्री उपरकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विमानतळाचीही स्थिती अशीच आहे. जिल्ह्यात विमानतळ झाले मात्र विमाने कधी येतात तर कधी येत नाही. त्यामुळे प्रवासी विमानाने प्रवास करत नाहीत. राज्यकर्ते व सत्ताधारी विविध घोषणा करून फक्त देखावूपणा करत आहेत असेही त्यांनी सांगितले.

दीपक केसरकर फक्त गोड बोलतात, काम शून्य: परशुराम उपरकर
परशुराम उपरकर म्हणाले, ज्यावेळी डीएड ,बीएड आंदोलनकर्त्यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी त्यांनी आपल्या सवयीप्रमाणे आंदोलनकर्त्यांना गोल गोल उत्तरे येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या डीएड, बीएड विद्यार्थ्यांनी ना. केसरकर यांना कैचीत पकडल्याचे दिसून आले. पूर्वीचे मंत्री सचिवांना हे काम करा असे सांगत होते, मात्र ना. दीपक केसरकर यांनी त्या विद्यार्थ्यांना सचिवांकडे जाण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांनी ते काम केले तरच मी करेन असे सांगितल्याचे दिसून आले. त्यामुळे ना. दीपक केसरकर हे फक्त गोड गोड बोलतात. मात्र कोणतीही कामे करत नाहीत अशी टीका श्री. उपरकर यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!