मालवण : तालुक्यातील पेंडूर माजी सरपंच तथा कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रा. संजय नाईक (वय – ५४, रा. पेंडूर) यांचे आज पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले. शिक्षण क्षेत्रासह ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. भारतीय जनता पार्टीचे ते सक्रिय पदाधिकारी होते. कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व तसेच उपक्रमशील मुख्याध्यापक अशी ओळख असलेले प्रा. संजय नाईक हे आपल्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरातील नागरिक आणी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कट्टा पंचक्रोशीसह संपूर्ण शिक्षण क्षेत्राला धक्का बसला आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रा. संजय नाईक हे माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे कट्टर कार्यकर्ते होते. पेंडूर गावचे सरपंच पद देखील त्यांनी भूषवले होते. कट्टा येथील वराडकर हायस्कुल मध्ये शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या प्रा. नाईक यांनी अलीकडे हायस्कुलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली होती. उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून अल्पावधीतच त्यांनी ओळख निर्माण केली होती. सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी भरीव असे काम केल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग परिसरात होता. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे राहत्या घरी निधन झाले. कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाचे ते सदस्य होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या दुपार नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, काका, तीन भाऊ, वहिनी, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.