मागील अनेक दिवस बस सेवा देखील बंद ; ग्रामस्थ बस सेवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत
कणकवली : तालुक्यातील नाटळ यर्थे नाटळ फाटा ते थोरले मोहुळ या ग्रामीण रस्त्यावरील पावसाळ्यात वाढलेली झाडी व रस्त्याची येथील तरुणांनी श्रमदानाच्या माध्यमातून साफसफारई व डागडुजी करत संबंधीत खात्यास जाग आणली आहे.
मागील काही दिवसांपासून नाटळ गावातील थोरले मोहुळ व धाकटे मोहुळ या विभागात येणारी एस.टी सेवा बंद आहे. यामुळेच शाळा, काॅलेजात जाणारे विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिक, स्त्रियांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. तीन ते चार किलोमीटरवर नरडवे रोड या मुख्य रस्त्यापर्यंत सगळ्यांना पायपीट करावी लागत आहे.
सध्या पंतप्रधान सडक योजनेतून हा रस्ता होत आहे. परंतु पाऊस सुरु झाल्यामुळे हे काम आता पावसानंतर पूर्णत्वास जाणार आहे. संबंधित विभागाने व ठेकेदारांनी तात्पुरती रस्त्याची डागडुजी केलेली आहे. मात्र तरीही पावसाळ्यात रस्त्यावर काही झाडे – झुडपे यांचा अडसर असल्यामुळे बस सेवा सुरु झालेली नाही.
त्यामुळे येथील काही सुजाण ग्रामस्थांनी सदर झाडे – झुडपे यांचा अडसर दुर करुन मार्ग मोकळा करून देण्याचे कार्य केले आहे. तसेच गावचे सरपंच यांना याबाबत लक्ष देवुन एस.टी बस सेवा सुरु होण्याबाबत महामंडळास विनंती करावी अशी मागणी देखील केलेली आहे. एस.टी महामंडळाला ही सदर बाबतीत विनंती अर्ज दिलेला आहे. नाटळ ग्रामस्थ एस.टी बस सेवा लवकरच होईल व गावातील विद्यार्थी व वृध्द नागरिक यांची होणारी गैरसोय दुर होईल या प्रतिक्षेत आहेत.
यावेळी दिगंबर सावंत, निलेश सावंत, पांडुरंग सावंत, अनिल सावंत, संतोष राणे, गणेश सावंत, दशरथ नाटळकर, अमोल डोंगरे, श्री. गुडेकर, पपू राणे, टिकू गुडेकर यांनी गावासाठी एकदिवस श्रमदान करून तरुणांना आदर्श घालून दिला.