मित्र पक्षावरच दबाव टाकल्याने देशात अस्थिरता
सिंधुदुर्गनगरी : भाजपा मित्रपक्षांना विश्वासात घेत नाही. त्यांच्यावर दबाव टाकत आहे. परिणामी देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. राज्यातील भाजपा नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिंदे सेनेचे नेते सुधीर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केला, तसेच जिल्ह्यात उद्योग यावेत यासाठी वारंवार लक्ष वेधूनही कोणताही उद्योग आणला नाही केवळ घोषणा होताना दिसत असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. ब्रिगेडियर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपा आणि भाजपा नेत्यांवर आपली उघड नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक होऊन केंद्रात भाजपा सरकार स्थापन झाले. मात्र तेही स्थिर नाही. राज्यात युती असतानाही भाजपाने शिंदेसेनेवर दबाव आणून कमी जागा दिल्या. भाजपाचा दबाव एवढा होता की मुख्यमंत्र्यांच्या मुलाला तिकीट जाहीर होत नव्हते. युती असताना मित्र पक्षावर एवढा दबाव टाकणे योग्य नाही. भाजपच्या दबावाच्या परिणामामुळे राज्यात भाजपा आणि समविचारी पक्षांना पराभव पत्करावा लागला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपा मंत्री नेते यांच्याकडून मित्र पक्षांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं आहेत. आम्ही जील्हावसियांच्या हिताचे अनेक प्रश्न भाजपा समोर मांडले मात्र जिल्ह्यातील भाजपा मंत्री, नेते यांनी त्याकडे कानडोळा केला असल्याचा आरोपही सावंत यांनी यावेळी केला. जिल्ह्यात उद्योग येत नाहीत, आतापर्यंत केवळ घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग आणले जात नाहीत. उलट महाराष्ट्रात असलेले उद्योग गुजरातला गेल्याचे दिसत असल्याचा आरोप करत सत्ताधारी शिंदेसेनेचे सुधीर सावंत यांनी सरकारलाच घराचा आहेर दिला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा शिंदे सेनेची युती असतानाही भाजपाकडून युती म्हणून निवडणूक लढविली गेली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही युती ही नावापुरतीच असेल असे सुधीर सावंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिंदे सेना आणि भाजपा यांची युती असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवेळी मागील निवडणुकीत ज्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे त्या जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे कुडाळ आणि सावंतवाड़ी विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचाच उमेदवार असणार असल्याचे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.