मालवण : अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबई आयोजित शास्त्रीय गायन तसेच हार्मोनियम वादन परीक्षेत मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेतून परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात १२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.
भंडारी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या विविध विभागांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण आणि स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळेत शास्त्रीय संगीत वर्ग गेली बरा वर्षे यशस्वीपणे चालविला जात आहे. या वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण व्हावी , संगीत संस्कारांचे रोपण व्हावे, व शास्त्रीय संगीताशी संबंधित गायन वादनाच्या विविध परीक्षांच्या माध्यमातून त्यांनी आपले ज्ञान अद्यावत करावे ही उद्दिष्टे साधली जातात. हा संगीत वर्ग प्रशिक्षित शिक्षक वृंद आणि आवश्यक संगीत वाद्य यांनी अद्यावत आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही एप्रिल २०२४ या सत्रामध्ये प्रशालेचे १६ विद्यार्थी गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई आयोजित शास्त्रीय गायन आणि हार्मोनियम वादन या दोन विषयांच्या परीक्षांसाठी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून १६ पैकी १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे – शास्त्रीय गायन- प्रारंभिक परीक्षा एकूण प्रविष्ठ विद्यार्थी -१० प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण- १०, हार्मोनियम वादन – प्रारंभिक परीक्षा- प्रविष्ठ विद्यार्थी १, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण १, शास्त्रीय गायन – प्रवेशिका प्रथम परीक्षा – एकूण प्रविष्ठ विद्यार्थी – ५, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण – १, द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण – ४. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.