विजापूर डेपो अपघात प्रकरण; गुन्हा दाखल न झाल्यास उद्या पुन्हा आंदोलन
कुडाळ : विजापूर डेपो मध्ये झालेल्या अपघात प्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्यामुळे कुडाळ डेपोच्या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. यावेळी तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरली. त्यानंतर झालेल्या चर्चेअंती संध्याकाळी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर उद्या पहाटेपासून कुडाळातून एक ही गाडी धावणार नाही, असा इशारा एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ एसटी आगाराची कुडाळ-विजापूर बस घेऊन विजापूरला गेलेल्या आणि रात्री विजापूर आगारात थांबलेल्या दोन एसटी कर्मचाऱ्यांना तिथल्याच बसची धडक बसून ते गंभीर जखमी झाले होते. सतीश रमेश मांजरेकर (चालक, कुडाळ आगार, वय ४९ रा. पाट -गांधीनगर, ता. कुडाळ) आणि सचिन गणपत रावले (वय ३६, वाहक- कुडाळ आगार, रा. निवती, ता. वेंगुर्ले) अशी या गंभीर जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हा अपघात हा विजापूर डेपो नं. १ येथे १२ जून, बुधवारी रात्री १० च्या सुमारास घडला. या दोघांवर मिरज येथील भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. बुधवारी रात्री अपघात घडून देखील आज शुक्रवार पर्यंत याबाबत अपघात करणाऱ्या त्या विजापूर डेपोच्या मेकॅनिकवर अजून पोलिसात कोणतीच तक्रार दाखल झाली नाही. त्यामुळे कुडाळ आगारच्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन सुरु केले. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमाराला हे आंदोलन सुरु झाल्यामुळे कुडाळ आगारातून एकही गाडी सुटली नाही. त्याचा फटका प्रवाशांना बसला. कुडाळ डेपोमध्ये सर्व कर्मचारी एकत्र जमले होते. त्याठिकाणी पोलीस कर्मचारी देखील दाखल झाले. एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक आणि मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी डेपोत येत कुडाळचे डेपो मॅनेजर संदीप पाटील याना धारेवर धरले. तीन दिवस होऊन देखील एफआयआर का दाखल केला नाही ? तुम्ही त्या विजापूरच्या चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात का ? त्या चालकाने मद्यधुंद अवस्थेत अपघात केला असेल तर त्याची वैद्यकीय तपासणी आता होईल का ? अशा प्रश्नांचा भडीमार संदीप पाटील यांच्यावर करण्यात आला. लगेच एफआयआर दाखल केला पाहिजे होता हे डेपो मॅनेजर यांनी मेनी केले. एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न असून देखील एसटी प्रशासन एवढं ढिम्म कसे राहू शकते असा संतप्त सवाल यावेळी ऊपस्थित करण्यात आला. मात्र येथे कुडाळ कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसून प्रशासांचे नाक दाबताच विजापूर येथे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. अपघातग्रस्त त्या कर्मचाऱ्यांपैकी सतीश रमेश मांजरेकर हे गंभर जखमी आहेत. त्याचा पाय काढून टाकावा लागणार आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्धवस्त होण्याची शक्यता आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी किंवा त्यांच्या वारसांना एसटीमध्ये नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात आली. हि चर्चा सुरु असताना कुडाळ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला कुडाळ डेपोत आल्या. त्यांनी कर्मचारी, नेते आणि डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा केली. एएफआयआर दाखल करण्याबाबत विजापूर येथे फोन लावून माहिती घेतली. एफआयआर दाखल होईल त्यांची कॉपी तुम्हला मिळेल तुम्ही एसटी बंदचे आंदोलन मागे घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी विनंती आंदोलकांना केली. तक्रार दाखल झाल्याची प्रत आज रात्री पर्यंत मिळावी आणि इतका वेळ गाड्या कुडाळ आगारात उभ्या राहिल्या म्हणून डेपो मॅनेजरवर कारवाई करावी या मागण्या ठेवून डेपो बंद आंदोलन स्थगित करण्यात आले, पण या प्रमाणे झाले नाही तर मात्र उद्या सकाळ पासून कुडाळ आगारातून एकही बस होऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यानंतर दोन तास चाललेल हे बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आणि गाड्या सुरू झाल्या पण दरम्यान प्रवाशांचे मात्र हाल झाले.