कणकवली | मयुर ठाकूर : कणकवलीत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर लागलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी आरोप केले होते. त्यानंतर त्याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरणही केले होते. तर आमदार नितेश राणे यांनी काही जणांचा हिशोब चुकता करायचा आहे असा इशारा देखील कणकवलीतील पत्रकार परिषदेत दिला होता.
मात्र त्यानंतर याबाबत माहितीतील अंतर्गत धुसपुस चव्हाट्यावर आली होती. यादरम्यान नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनचा शिवसेना नेते किरण सामंत व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी लावलेला शिवाजी महाराज चौकातील बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आला होता. त्यामुळे याबाबतही उलट सुलट चर्चा सुरू असतानाच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कार्यालया बाहेर हा लावलेला बॅनर सध्या राजकीय गोटात चर्चेचा विषय बनला आहे. “वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे” या आशयाचा इशारा देणारा बॅनर राजकीय गोटात चर्चेचा विषय बनला आहे. हा इशारा नेमका कुणाला हे सुज्ञास सांगे सांगणे न लगे. असे जरी असले तरी उदय सामंत व किरण सामंत यांच्या राजकीय वाटचालीस सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बॅनर वरून आता सिंधुदुर्गातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.