मालवण : आडवली घाडीवाडी येथील त्रयस्थ व्यक्तीच्या मालकीची जमीन स्वतः मालकीची असल्याचे भासवून व तसेच नावाचा खोटा सातबारा तयार करून बनावट सातबाराच्या आधारे फिर्यादीस मे. दुय्यम निबंधक कार्यालयात साठेकरार लिहून देऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आडवली मालवण येथील संशयीत आरोपी विनोद विवेक लाड (वय 44) याची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी रक्कम रु 15,000 च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे अॅड. स्वरुप नारायण पई व अॅड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.
आडवली घाडीवाडी येथील जमीन मिळकत विकत घेऊन देतो असे आश्वासन देऊन आरोपी याने फिर्यादीकडून पैसे घेतले व त्यानंतर आरोपी 1 व 2 यांनी संगनमताने बनावट सातबाराच्या आधारे फिर्यादीस मे. दुय्यम निबंधक मालवण यांचेकडे साठेखत लिहून दिले व त्यानंतर फिर्यादीस ही फसवणूक लक्षात आल्यावर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार 29 नोव्हेंबर 2023 रोजी आचरा पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कलम 420, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये आरोपी विनोद लाड यास 17 मे 2024 रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
त्यानंतर आरोपीतर्फे दाखल करण्यात आलेला जामीन अर्जाचे सुनावणीअंती 5 जून रोजी मे. मालवण न्यायालयाने आरोपीची रक्कम रु. 15,000 च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे.