देवगड : येथील मोंड गावातील कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे दोनशे मीटरचा रस्ता पावसामुळे वाहून गेला असून त्याची माती नागरिकांच्या घरामध्ये गेली आहे. शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता वाहून गेला असल्याने “पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून” अशी परिस्थिती झाली आहे. या रस्त्याचे नूतनीकरण सुमारे दोन वर्षापूर्वी करण्यात आले होते. या घाटीरस्त्याच्या बाजूला सुमारे चार ते पाच फूटाचा चर पडून तेथील माती पाण्याच्या बदलेल्या प्रवाहाने नजीकच्या घरांमध्ये घुसली.
यामध्ये सुमारे पाच ते सहा घरे बाधित झाली आहेत. वाडीकडे जाणारा हा घाटीरस्ता शेतकऱ्यांची कायमस्वरुपी ये- जा करण्यासाठीची मार्ग असून घाटीच्या वाहून गेलेल्या मातीमुळे या घाटीरस्त्यावर चालणेही मुश्किल झाले आहे. या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
मयुर ठाकूर | संपादक