कणकवली | मयुर ठाकूर : मान्सूनच्या आगमनानंतर तळ – कोकणात पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गात मृग नक्षत्रानंतर भात पेरणीला सुरुवात होते. यंदा मान्सूनचं आगमन लवकर झालं. त्यामुळे आनंदी झालेला बळीराजा आपल्या ढवळा – पवळ्यासोबत शेतामध्ये वावरताना दिसतोय. तळ – कोकणात भात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दोन – तीन दिवस पाऊस पडला. त्यामुळं बळीराजा सुखावला आणि अगदी आनंदाने आपल्या शेतातील पेरणीच्या कामांना सुरुवात केली.
पावसाच्या सरी कोसळत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये देखील काही प्रमाणात पावसाच्या सर बरसल्या. कडाक्याने तापलेली भूमाता थंड झाली असून वातावरणात मातीचा सुगंध दर्वळलेला अनुभवता येतो.