कणकवली | मयुर ठाकूर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुमारे ४६ हजार रुपये किमतीचा पानमसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कासार्डे, दक्षिण गावठाण येथील आदिनाथ महावीर कराडे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपये किमतीच्या जाचमुचलक्याचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
१८ एप्रिल २०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कासार्डे, दक्षिण गावठाण येथील किरकोळ व्यावसायिक आदिनाथ कराडे याच्या घराशेजारी खोपीमध्ये केलेल्या कारवाईत सुमारे ४६ हजार रुपये किमतीचा विमल, कैसरयुक्त पानमसाला व सुगंधी तंबाखू व इलायची अशी पाकिटे आढळून आली होती.
याप्रकरणी हवालदार राजेंद्र जामसांडेकर यांनी तक्रार दिल्यानुसार कणकवली पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२८ सह अन्न सुरक्षा मानके कायदा कलम २६, २७, ३० व ५९ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
आरोपीला एक दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्यावतीने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होत यापुढे गुटखा विक्री करणार नाही, असे हमीपत्र देण्याच्या अटींसह अन्य अटींवर जामीन मंजूर केला. संशयिताच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले