24.2 C
New York
Tuesday, March 31, 2026

Buy now

अपहरणाचा संशय फोल; मुलीच्या जबाबामुळे तरुणांना दिलासा

कथित अपहरण नाट्यावर अखेर पडदा

सावंतवाडी :
शहरालगतच्या एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून सावंतवाडी पोलिसांनी रत्नागिरी येथे केलेली धाडसी कारवाई अखेर वेगळ्या वळणावर येऊन थांबली आहे. “मी कोणाच्याही दबावाखाली नसून स्वतःच्या मर्जीने मित्रांसोबत गेले होते,” असा स्पष्ट जबाब संबंधित मुलीने दिल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांना नोटीस बजावून मुक्त केले आहे. त्यामुळे या कथित अपहरण प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.

संबंधित मुलगी मुंबईत शिक्षणासाठी असताना तिची एका तरुणाशी मैत्री झाली होती. मात्र, पालकांचा या मैत्रीला विरोध असल्याने तिला पुन्हा सावंतवाडीत आणण्यात आले होते. दरम्यान, रविवारी ती अचानक घरातून बेपत्ता झाल्याने पालकांनी पोलिसांत धाव घेतली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सावंतवाडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संशयित रेल्वेने मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. रविवारी मध्यरात्री सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सापळा रचून मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी साई बसवेश्वर रिंजे (वय १८) आणि रोन मोहन राठोड (वय १८) यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर तिसरा संशयित अल्पवयीन होता. मात्र, सावंतवाडीत आणल्यानंतर मुलीने दिलेला जबाब निर्णायक ठरला.

“आम्ही सर्व मित्र असून गेल्या अनेक वर्षांपासून आमची ओळख आहे. मी मुंबईला आजीला भेटायला जात असल्याची माहिती आईला दिली होती. माझ्यावर कोणतीही जबरदस्ती झालेली नाही,” असे मुलीने आपल्या जबाबात स्पष्ट केले.

घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी साई रिंजे आणि रोन राठोड यांना नोटीस देऊन सोडून दिले, तर अल्पवयीन मुलाला सक्त ताकीद देण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!