चार आरोपीना अटक ; दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी
पाचवा आरोपीही पोलिसांच्या ताब्यात
कणकवली : कोंडये गावातील वरचीवाडी येथे घडलेल्या सुमारे दोन टन काजू बियांच्या मोठ्या चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने वेगाने छडा लावून आरोपींना गजाआड केले आहे. सुमारे ३ लाख २० हजार रुपयांच्या काजू बियांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, पाचव्या आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे.
दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर व विलास विठ्ठल तेंडुलकर यांच्या मालकीच्या सुमारे सात एकर क्षेत्रातील काजू बागेत ही चोरी घडली. बागेतील शेतमांगरामध्ये काजू बियांचा साठा ठेवण्यात आला होता. २२ मार्च रोजी सायंकाळी कुलूप लावून ते घरी परतले होते. मात्र २३ मार्च रोजी सकाळी शेतमांगराचा कडी-कोयंडा तुटलेला आढळून आला. आत पाहणी केली असता सुमारे दोन टन काजू बियांचा साठा चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे तपास करताना कणकवली शहरातील काही तरुणांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी पप्या सुनील पवार (वय २६), संदीप सुरेश पवार (वय २२) व बंटी स्वप्नील पवार (वय २२) यांना अटक केली. तसेच काजू वाहतुकीसाठी वापरलेल्या टेम्पोचा मालक अनंत मधुकर परब यालाही आरोपी करण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरलेला टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणातील पाचवा आरोपी सागर मधु निकम (वय २२) यालाही एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपींनी चोरी केलेल्या काजू बियांची विक्री विरण–पोईप परिसरात केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एएसआय राजू जामसांडेकर यांच्यासह पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.