कणकवली: नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अस्वच्छतेबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केलेल्या तातडीच्या कारवाईचा परिणाम सकारात्मक दिसू लागला आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी प्रकल्पाची पाहणी करताना साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न होणे पाहून पारकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते.
नगराध्यक्षांच्या रुद्रावतारानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. गेल्या चार दिवसांत युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, साचलेला कचरा हटवला गेला, जंतुनाशक फवारणी करण्यात आली आणि प्रकल्पातील यंत्रणा सुरळीत करण्यात आली. आज प्रकल्प परिसर पूर्णपणे स्वच्छ असून, दुर्गंधीही कमी झाली आहे.
नगराध्यक्षांच्या कडक कारवाईमुळे शहरातील महत्त्वपूर्ण प्रकल्पातील समस्या मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
नगरपंचायत निवडणुकीपूर्वी संदेश पारकर यांनी शहरातील प्रकल्पांना, विकास कामांना चालना देण्याचा व लोकाभिमुख काम करण्याचा विश्वास दिला होता. निवडणूक जिंकल्या नंतर त्यांनी शहरातील स्वच्छता, प्रलंबित विकास कामे आणि प्रकल्पांची देखभाल यांचा आढावा घेतला. आढळलेल्या त्रुटींवर सक्त सूचना देऊन त्या तातडीने मार्गी लावल्या गेल्या.