सध्या सुरू असलेल्या कामांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला विकास निधी
मंजूर झालेली सर्व कामे आमच्या कारकिर्दीतील – बंडू हर्णे
कणकवली : कणकवली शहराच्या विकासासाठी आम्ही सत्तेत असताना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विविध विकासकामांसाठी निधीची मागणी करत प्रस्ताव सादर केले होते. त्या प्रस्तावांना जिल्हा नियोजन विकास निधी, रस्ते विकास निधी आणि नगरोत्थान योजनांमधून सन २०२५-२६ साठी १२ कोटी ६० लाख ४३ हजार रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्या वेळी निविदा प्रक्रिया होऊ शकली नव्हती. मात्र आता या विकासकामांचे श्रेय घेत सत्ताधारी मंडळी भूमिपूजन कार्यक्रम करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला.
समीर नलावडे संपर्क कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरातील विविध विकासकामांना मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली. कणकवली-टेंबवाडी (हिंद छात्रालय) ते रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी या १२ मीटर डी.पी. रस्त्यासाठी उर्वरित जमीन भू-संपादनासाठी १ कोटी, निम्मेवाडी बाईत घर रस्ता डांबरीकरण, नरडवे रोड मोहन माळ येथे संरक्षक भिंत, टेंबवाडी येथे सोलार पथदीप, बिजलीनगर येथे गटर बांधकाम, हर्णे आळी येथे गटर बांधकाम, शहरातील विविध ठिकाणी सोलार हायमास्ट, रिंगरोड फेज १ व २ येथे सोलार पथदीप, परबवाडी परिसरातील फुटपाथ व गटर बांधकाम, परबवाडी रस्ता नुतनीकरण, एस.टी. वर्कशॉप रस्ता नुतनीकरण, मराठा मंडळ येथे गणेशघाट बांधकाम, तांडेल कॉम्प्लेक्स शेजारी गटर बांधकाम, परबवाडी येथील गणपती सान्याचे उर्वरीत बांधकाम, बाजारपेठ स्मशानभूमी नुतनीकरण, गणपती साना रस्ता परिसरातील गटर बांधकाम, तेलीआळी येथे गटर बांधकाम व रस्ता रुंदीकरण, बाजारपेठेतील हरिश्चंद्र हॉटेल ते लाड घर गटर बांधकाम, आप्पासाहेब पटवर्धन चौक ते मसुरकर किनई रोडपर्यंत रस्ता नुतनीकरण, महापुरुष मंदिरामागील गटर बांधकाम, कनकनगर येथे गटर बांधकाम, जळकेवाडी स्मशानभूमी येथे संरक्षक भिंत व शेड बांधकाम, टेंबवाडी येथे रस्ता गटर बांधकाम, नगरपंचायत सभागृह व परिसर नूतनीकरण, शहरातील बगीचे सुशोभीकरण व पायाभूत सुविधा, ब्राह्मणदेव स्थानाशेजारी पाईप गटर, तेलीआळी ते सह्याद्री हॉटेल रस्ता नुतनीकरण, मुरकर घर ते शाळा क्रमांक ५ रस्ता नुतनीकरण, निम्मेवाडी येथे पाणंद बांधकाम, क्रीडा सुविधा केंद्र येथे वुडन कोर्ट व मॅट बसविणे, मराठा मंडळ येथील रस्ता नुतनीकरण, बांधकरवाडी येथे पाणंद व रस्ता बांधकाम, सुतारवाडी येथे राणे सृष्टी ते धुरी घर रस्ता, मसुरकर किनई रस्ता मजबुतीकरण, माऊली नदी परिसर सुशोभीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा व परिसर सुशोभीकरण अशा विविध कामांना मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले.
आमच्याकडे सत्ता असताना शहराच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर होती आणि ती आम्ही समर्थपणे पार पाडली. २०२५ मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीनंतर सत्ताबदल झाला असून आता शहराच्या विकासाची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर आहे. सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून शहरासाठी निधी येत असेल तर त्याचे आम्ही स्वागत करू, शहराच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने कारभार होत असेल तर त्याला कडाडून विरोध केला जाईल, असे समीर नलावडे यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहराच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा निधी आणण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ही घोषणा प्रत्यक्षात उतरवून दाखविल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही नलावडे यांनी सांगितले.
दरम्यान कणकवली शहराच्या विकासासाठी नगर विकास विभाग आणि नगरपंचायत विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात ५१० हेक्टर जमिनीवर विविध आरक्षणे टाकण्यात आली आहेत. या आरक्षणाला नागरिकांचा विरोध असून चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या आरक्षणाविरोधात जमिनमालक आणि नागरिक उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी सांगितले. प्रारूप आराखड्याबाबत सूचना व हरकती नोंदविण्यासाठी २६ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता नगररचना विभाग, नगरपंचायत आणि सत्ताधाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहनही समीर नलावडे यांनी केले.
आमच्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या कामांची भूमिपूजने करून जनतेची दिशाभूल केली जातेय दिशाभूल – बंडू हर्णे
आम्ही सत्तेत असताना मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय सध्या सत्ताधारी मंडळी घेत असून विविध कामांची भूमिपूजने करून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप देखील बंडू हर्णे यांनी केला.
घोषणा सत्यात उतरविल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू – समीर नलावडे
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी जाहीर केलेला २०० कोटी रुपयांचा विकासनिधी शहरासाठी प्रत्यक्ष आणून दाखवावा. त्यांनी घोषणा सत्यात उतरविल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असे आव्हान समीर नलावडे यांनी दिले.