अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची साड्या-टॉवेलमधून साकारली चित्रकृती
कणकवली : ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (कॉमर्स व सायन्स) वरवडे आणि सोमस्थ अकॅडमी वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयडियल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची भव्य चित्रकृती साड्या व बाथटॉवेल यांच्या माध्यमातून साकारण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर साड्या व टॉवेल यांच्या आकर्षक मांडणीतून सिंधुताई सपकाळ यांचे प्रेरणादायी चित्र साकारण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिन हा थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. विज्ञानातील संशोधनासोबत समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करत विज्ञान आणि मानवता यांचा संगम या उपक्रमातून प्रतीकात्मकरीत्या मांडण्यात आला.
या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सविता आश्रम, पणदूर आणि दिविजा आश्रम, असलदे येथील आजी-आजोबांची उपस्थिती. त्यांच्या समक्ष हा उपक्रम साजरा करण्यात आला.
चित्रकृतीसाठी वापरण्यात आलेल्या साड्या व टॉवेल या दोन्ही आश्रमांतील आजी-आजोबांना भेटवस्तू स्वरूपात प्रदान करण्यात आल्या.
या उपक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, संचालिका गौसिया पटेल, संचालिका मनीषा सावंत, संचालिका सुरेखा भिसे, सीईओ डी. पी. तानावडे, संस्था सदस्य अनंत बडे, आयडियल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई, सोमस्थ अकॅडमीचे योगेश सामंत, नगरसेविका मेघा गांगण, काळसेकर मॅडम, रावराणे मॅडम, पूर्व प्राथमिक शाळा मान्यता परिषद भारतच्या विस्तार अधिकारी रुपाली कदम, कणकवली निधी अर्बन बँकेचे सीईओ रंजन चव्हाण, तसेच सविता आश्रम पणदूर व दिविजा आश्रम असलदे येथील पदाधिकारी उपस्थित होते.
चित्रकृतीची संकल्पना सिद्धेश साळसकर (कुडाळ) यांनी मांडली. तसेच ही कलाकृती साकारण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कलाशिक्षिका रजनी चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, दोन्ही आश्रमांतील आजी-आजोबा तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक हेमंत पाटकर यांनी केले.