2.6 C
New York
Thursday, February 19, 2026

Buy now

नाम.नितेश राणे यांची मोठी घोषणा; सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आरोग्य शिबिरे

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल

तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी नवी आरोग्य मोहीम

आरोग्य सेवेतील त्रुटींवर थेट दखल; दर तीन महिन्यांनी घेणार आढावा

कणकवली (मयुर ठाकूर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी आरोग्यव्यवस्था बिकट असून याबाबत जनतेमध्येही नाराजी आहे. वास्तविक जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेतच. मात्र, तोपर्यंत जिल्ह्यातील रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत, त्यासाठी जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये सध्या जिल्ह्यात नसलेले स्पेशालिस्ट डॉक्टर जिल्ह्याबाहेरील वेगवेगळ्या शहरांमधून आणण्यात येणार आहेत. पहीले शिबिर येत्या २७ फेब्रुवारीला कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री ना. नितेश राणे बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डिन डॉ.अनंत डवंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे – इंगवले, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील आदी उपस्थित होते.

पुढे ना. नितेश राणे म्हणाले, जिल्ह्यात स्पेशलिस्ट डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेकदा रुग्णांना गोवा – बांबोळी गाठावे लागते. याबाबत आमदार निलेश राणे यांनी सुद्धा जिल्हा नियोजन बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. त्याच अनुषंगाने आम्ही हे आरोग्य शिबिर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, शासकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, जिल्हा आरोग्य विभाग अशा सर्वांनी मिळून घेतल्याचेही ना. नितेश राणे म्हणाले.

या शिबिराविषयी अधिक माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील म्हणाले, स्पेशालिटी‌ शिबिर २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे होणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे येथे करण्यात येतील. हे शिबिर सर्वप्रथम वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ अशा पाच तालुक्यांसाठी राबविण्यात येत आहे. या पाचही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे येथे रुग्णांची प्राथमिक तपासणी होणार आहे. त्यानंतर २३ रोजी वैभववाडी ग्रामीण रुग्णालय, २४ रोजी देवगड ग्रामीण रुग्णालय आणि २५ रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे तज्ञ डॉक्टरांची टीम दाखल होईल. तेथे रुग्णांची आणखी एक तपासणी होईल. तर अंतिम आरोग्य शिबिर २७ रोजी कणकवली होणार आहे. आरोग्य शिबिराच्या जनजागृतीबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी आशा स्वयंसेविका आरोग्य कर्मचारी हे घरोघरी जाऊन नागरिकांना माहिती देणार आहेत.

शिबिरात सध्या जिल्ह्यात नसलेले स्पेशालिस्ट डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी, गरजेनुसार उपचार व शस्त्रक्रिया करणार आहेत. यामध्ये हृदयरोग, जनरल मेडिसिन, ग्रंथी रोगतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, कर्करोगतज्ञ, पोटांचे विकारतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, मूत्रविकारतज्ञ असे विविध तज्ञ डॉक्टर्स उपस्थित असणार असल्याचेही डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले.

दरम्यान जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये हलगर्जीपणा सुरू असून आजाराचे निदान करताना चुका केल्या जात आहेत. याबाबत आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ व श्री. आबिटकर यांचे लक्ष वेधणार आहे. हलगर्जीपणाबाबत राज्यशासन कठोर भूमिका घेणार असल्याचा इशाराही पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!