धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना शहरातील सर्व मंडळे तसेच भाविक भक्त व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे मंडळाकडून आवाहन…!
महापुरुष महाउत्सव संपर्क कार्यालयातून पत्रकार परिषदेद्वारे दिली माहिती…!
कणकवली | मयुर ठाकूर : अनिकेत उचले
शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराच्या रौप्यमहोत्सवानिमित्त श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळा १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या चार दिवसीय महाउत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरातील व्यापारी, नागरिक व भाविकांनी उत्स्फूर्त सहकार्य दिल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी व माजी अध्यक्ष राजू सापळे यांनी दिली.
महापुरुष मित्रमंडळाच्या उत्सव समितीच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष राजन पारकर, माजी अध्यक्ष राजेश सापळे,सचिव महेंद्र सांब्रेकर,
खजिनदार मंदार सापळे,महिला सदस्य अँड.चैताली मुंज,वैशाली काणेकर, प्रद्युम मुंज, अमित सापळे,चेतन अंधारी,संदीप अंधारी,चेतन मुंज, सोहम वाळके, वृषभ मेनकुदळे, पांडू डिचोलकर, कालिदास तेली,आनंद पोरे यासोबतच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
भव्य मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ
गुरुवार दि. १९ रोजी सायंकाळी ५ वाजता नवीन मूर्ती व कलशाची प. पू. भालचंद्र महाराज संस्थान येथून बाजारपेठ मार्गे महापुरुष मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगांच्या जयघोषात तसेच वारकरी संप्रदायाच्या सहभागासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
शुक्रवार दि. २० रोजी सकाळी नित्यपूजा, अभिषेक, प्रायश्चित्त, श्रीगणेशपूजन, पुण्याहवाचन, जलाधिवास, देवता आवाहन स्थापना आदी धार्मिक विधी पार पडतील. दुपारी महाआरतीनंतर भजनांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी पावणीदेवी समईनृत्य (किंजवडे-देवगड) सादर होणार असून रात्री श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूळ यांचा ट्रिकसिनयुक्त पौराणिक नाट्यप्रयोग रंगणार आहे.
शनिवार दि. २१ रोजी विविध शास्त्रोक्त विधी, वास्तुहोम, ग्रहयज्ञ, शिखर कलश स्थापना आदी कार्यक्रम होणार असून दुपारी तीर्थप्रसाद व भजनांचा कार्यक्रम होईल. रात्री महापुरुष मित्रमंडळाच्या महिलांचा ‘व्वा वुमनिया’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
रविवार दि. २२ रोजी पहाटे काकड आरतीनंतर श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांची प्राणप्रतिष्ठापना, बलिदान, पूर्णाहुती आदी विधी पार पडतील. सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महानैवेद्य व महाप्रसादाचे आयोजन आहे. सायंकाळी वारकरी भजन तर रात्री ९ वाजता सावनी रवींद्र लाईव्ह इन कॉन्सर्ट विथ स्वप्नील गोडबोले, अबोली गिन्हे यांचा सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे.
२१ रोजी रक्तदान शिबिर
मंदिराच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि. २१ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सिनेमॅटिक रिल्स स्पर्धेचे आयोजन
महाउत्सवानिमित्त १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सिनेमॅटिक रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ७,००० रु., द्वितीय ५,००० रु., तृतीय ३,००० रु. व आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. रिल्स सादर करण्याची अंतिम मुदत २४ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत असून बक्षीस वितरण समारंभ २४ फेब्रुवारी रात्री ९ वाजता होणार आहे. अधिक माहितीसाठी रुद्र सापळे व हार्दिक काणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महापुरुष मित्रमंडळातर्फे शहरातील सर्व मंडळे, भाविक व नागरिकांनी या भक्तिमय महाउत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो – महापुरुष महोत्सव च्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते (छाया – अनिकेत उचले)