कणकवली : एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या पर्समधील सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने कणकवली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सारिका संदीप गोसावी (वय ५२) या लोरे नंबर २ येथील गोसावीवाडीच्या मूळ रहिवासी असून सध्या दौंड, पुणे येथे वास्तव्यास आहेत. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास त्या लोरे नंबर २ येथे जाण्यासाठी फोंडाघाट बसस्थानकात आल्या होत्या. कणकवली-मौदे या एसटी बसमधून प्रवास करत असताना तिकीटासाठी पैसे देण्यासाठी त्यांनी पर्स उघडली असता पर्समधील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सुमारे ४ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला. बसमध्ये व परिसरात शोधाशोध करूनही दागिने आढळून आले नाहीत. चोरीच्या धक्क्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी पुणे येथे नेले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शुक्रवारी कणकवली पोलिस ठाण्यात याबाबत अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार सुभाष शिवगण करीत आहेत.