1.6 C
New York
Sunday, March 29, 2026

Buy now

कणकवली नगरपंचायतीत विषय समित्यांच्या निवडीवरून सत्ताधारी-विरोधकात ताणाताणी !

समान मतांमुळे चिठ्ठीचा कौल ‘समिती न नेमण्या’कडे!

स्थायी समितीच्या निवडीवरूनही खडाजंगी!

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात विषय समित्यांचे सभापती आणि समित्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार वादंग पाहायला मिळाले. समित्या नेमण्यावरून दोन्ही बाजूंनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. दरम्यान, स्थायी समितीच्या वैधतेवरूनही दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाल्याने पीठासीन अधिकारी गौरी पाटील यांनी सभेचा निर्णय राखून ठेवत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर निर्णय देण्याचे स्पष्ट केले.​

नगरपंचायतीच्या सभागृहात विषय समिती सभापती निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी गटनेते रुपेश नार्वेकर यांनी ‘सध्या समित्या नेमण्यात येऊ नयेत’ असे लेखी निवेदन दिले. यावर विरोधी भाजप गटनेत्या सुप्रिया नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. लोकशाही प्रक्रियेनुसार समित्यांची निवड होणे आवश्यक असल्याचे सांगत विरोधकांनी निवडीचा आग्रह धरला.

​दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू राहिल्याने पीठासीन अधिकारी गौरी पाटील यांनी या विषयावर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूने समान मते पडल्याने पेच निर्माण झाला. अखेर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्याचे ठरले. नशिबाने सत्ताधारी गटाची बाजू सावरून धरली आणि ‘समित्या न नेमण्याचा’ निर्णय चिठ्ठीतून जाहीर झाला.​विषय समित्यांचा निर्णय झाल्यानंतर स्थायी समिती गठीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भाजपचे स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. जोपर्यंत इतर विशेष समित्या स्थापन होत नाहीत, तोपर्यंत स्थायी समिती स्थापन करता येत नाही, असा दावा त्यांनी केला. या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये पुन्हा एकदा शब्दांच्या चकमकी उडाल्या.​वाढता वाद आणि तांत्रिक पेच लक्षात घेता, पीठासीन अधिकारी गौरी पाटील यांनी या विषयावर तात्काळ निर्णय न देता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय दिला जाईल, असे जाहीर केले. यामुळे काही काळ सभेचे कामकाज थांबवण्यात आले.या सभेला नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, गटनेते रुपेश नार्वेकर, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, लूकेश कांबळे, बाळू पारकर, जुई मुरकर, सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, भाजप गटनेत्या सुप्रिया नलावडे, नगरसेवक राकेश राणे, स्वप्निल राणे, संजय कामतेकर, बंडू हर्णे, मेघा गांगण, मेधा सावंत, आर्या राणे, प्रतीक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर आणि नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!