सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपने एक नवीन आणि धोकादायक पॅटर्न सुरू केला असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट पैशांचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे. जिल्हा परिषद उमेदवाराला १० लाख रुपये आणि पंचायत समिती उमेदवाराला ५ लाख रुपये देऊन अर्ज मागे घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
जर खरोखरच भाजपने विकासकामे केली असतील, तर त्यांनी जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवावी. हिम्मत असेल तर बिनविरोध निवडीचा मार्ग न पत्करता थेट जनतेचा कौल स्वीकारावा, असा इशाराही सुशांत नाईक यांनी दिला.
गेल्या तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद निवडणुका होत असताना, त्यालाही भाजप सामोरे जाण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुका झाल्याच नाहीत तर जनतेला मतदानाचा अधिकार कसा मिळणार? असा सवाल उपस्थित करत भाजप लोकशाही संपवण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले. उमेदवार नाराज नसल्याचा दावा खोटा असून, पैशासमोर कोणाचीही नाराजी टिकत नाही, अशी टीका त्यांनी केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अनेक उमेदवार हे ग्रामीण भागातील, शेती किंवा छोटे व्यवसाय करणारे सामान्य नागरिक असतात. अशा उमेदवारांना १० ते १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जर हीच रणनीती सर्व निवडणुकांमध्ये वापरली गेली, तर भविष्यात समोर उमेदवारच उरणार नाही. नागरिकांना मतदानाची संधीच मिळणार नसेल, तर लोकशाही जिवंत कशी राहील? असा थेट प्रश्न उपस्थित करत सुशांत नाईक यांनी भाजपच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.