विधानसभा अध्यक्ष पदाचा दिला राजीनामा
कणकवली : २०१९ शिवसेना पक्षात प्रवेश केला. २०२२ पासून ठाकरे शिवसेना पक्षाचा कणकवली विधानसभा अध्यक्ष पदाचा काम पाहत होतो. जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता सत्तेतील पक्षात जाण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतक-यांच्या विम्याचे प्रश्न, लोकांचे प्रश्न पाहता न्याय देण्यासाठी सत्तेतील पक्षात जाण्याचा निर्णय उद्या दुपारपर्यंत घेणार आहे. ठाकरे शिवसेनेच्या विधानसभा अध्यक्षपदाचा मी राजीनामा देत असल्याची माहिती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सुशांत नाईक व कार्यकर्त्यांनी मला सहकार्य केले आहे. मात्र, शासन स्तरावर प्रश्न सोडविण्यासाठी शासनात राहण्याची गरज आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी सातत्याने सत्तेत जाण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आग्रह धरला होता. त्यामुळे उबाठा पक्षाचा राजीनामा देत आहेत. माझ्या कार्यकर्त्याचा विचार घेऊन उद्या दुपारपर्यंत निर्णय घेणार आहे. मी उबाठा पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले, तेव्हा हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातून मंगेश सावंत यांनी अर्ज मागे घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेली धरणे, रखडलेले पाठबंधारे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. जिल्ह्यातील काजु हमीभावाबद्दल प्रश्न आहे, जिआय मानांकन करण्यासाठीं मी प्रयत्न केले आहेत, मात्र, यश आले नाही. आंबा बागायतदारांबद्दल काही प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी मी काम करणार आहे. त्यामुळे
सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार आहे, जो प्रश्न सोडविण्यासाठी मला ताकद देणार त्यांच्या पाठीशी आम्ही राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी ठेकेदार नाही, ठेकेदारी हा व्यवसाय नाही. माझा शेती, बिल्डिंग व्यवसाय आहे. मी जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य असताना ज्या योजना आणल्या आहेत, त्या योजना पून्हा पूर्ण ताकदीनिशी राबवण्याचे माझे प्रयत्न असतील. सिंधूरत्न ही योजना चांगली आहे. त्या योजनेबद्दलही मला काम करायचे आहे, असे सतीश सावंत यांनी सांगितले.
उबाठा पक्ष सत्तेत नसल्याने कार्यकर्त्याची लढण्याची मानसिकता नाही. कार्यकर्त्याची लढण्याची तयारी नाही. त्यामुळे सत्तेच्या प्रवाहात जाणार आहे, हे निश्चित आहे. सत्तेच्या प्रवाहात असलो, तर कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे. लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी मी सत्तेचा मार्ग निवडणार आहे. मी केव्हाही गटबाजीला थारा देत नाही. चारवेळा जिल्हा परिषद मध्ये निवडणूक लढवली आहे, आमदारकी लढवली आहे, त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदमध्ये निवडणूक लढवणार नव्हतो. आता मी सहकार क्षेत्रात काम करणार आहे. काही दुग्ध संस्थांमध्ये मी काम करेन. जिथे जाईन तिथे लोकांच्या प्रश्नाच्या न्यायासाठी माझे प्रयत्न करणार असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले.