प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओरोस येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागरिकांनी आंदोलन व उपोषण सुरू केले असून, थेट प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लोकशाहीला न्याय मिळावा या उद्देशाने हे आंदोलन छेडण्यात आले आहे. प्रशासनाला आंदोलनाची पूर्वकल्पना देऊनही अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही अथवा ठोस दखल घेतलेली नसल्याने आंदोलक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांनी आपल्या मागण्यांसाठी लक्षवेधी, आमरण उपोषण तसेच आत्मदहनासारख्या टोकाच्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे. मात्र, इतक्या गंभीर स्वरूपाच्या आंदोलनानंतरही प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधानिक हक्क, लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे अपेक्षित असताना जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे लोकशाहीचा अपमान होत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. आपल्या मागण्या वारंवार मांडूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेवटी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
आंदोलनस्थळी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.