कणकवली : फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनंत गंगाराम पिळणकर यांच्या निवडणूक प्रचाराचा फोंडाघाट येथे उत्साहात शुभारंभ झाला. प्रचारादिवशी मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने प्रचाराला दमदार सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
फोंडाघाट परिसरात कालपासूनच अनंत पिळणकर यांनी पदयात्रा, घरभेटी आणि थेट मतदारसंवादाच्या माध्यमातून प्रचार केला. यावेळी नागरिकांनी आपापल्या समस्या, अपेक्षा आणि विकासासंबंधीच्या मागण्या मांडल्या. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार श्री. पिळणकर यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा प्रचारात सक्रिय सहभाग दिसून आला. विकास, विश्वास आणि परिवर्तन या भूमिकेला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे वातावरण फोंडाघाट परिसरात पाहायला मिळत आहे.
आगामी काळात संपूर्ण फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात व्यापक प्रचार फेरी राबविण्यात येणार असून, जनतेचा वाढता पाठिंबा विजयाचा विश्वास देत असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.