भाजपचा एक उमेदवार बिनविरोध
कणकवली :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यात शुक्रवारी चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे काही मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट होत असून एका मतदारसंघात भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुजाता हळदिवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उज्ज्वला चिके यांनीही माघार घेतली आहे. तसेच वरवडे पंचायत समिती मतदारसंघातून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सुधीर सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार शांताराम सादये यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
या माघारीमुळे वरवडे पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आले आहेत. कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण २२ जागांसाठी ८७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी असून, त्यानंतर सर्व मतदारसंघांतील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.