सुरक्षेअभावी रुग्ण व नातेवाईकांमध्ये अस्वस्थता
कणकवली : जिल्ह्यातील मध्यवर्ती व अत्यंत महत्त्वाचे रुग्णालय म्हणून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जाते. तालुक्यासह संपूर्ण परिसरातील गंभीर आजार, अपघातग्रस्त रुग्ण तसेच आकस्मिक घटनांमधील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र इतक्या संवेदनशील रुग्णालय परिसरात अद्याप सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दररोज मोठ्या संख्येने रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी तसेच बाहेरील व्यक्तींची वर्दळ असते. अपघात, भांडणे, गैरसमज, साहित्य चोरी किंवा वादाच्या घटना घडल्यास त्याचा ठोस पुरावा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे अनेक वेळा चौकशी अपुरी ठरते. यामुळे रुग्ण, नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णालयात दाखल रुग्णांची जबाबदारी मोठी असताना सुरक्षा यंत्रणा अपुरी असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही वेळा रुग्णालय परिसरात अनुचित प्रकार घडल्याचे आरोप होत असून, सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सत्यता समोर येत नाही. परिणामी तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी जोरदार मागणी रुग्ण व नागरिकांकडून केली जात आहे.
सुरक्षा वाढल्यास अधिकारी व कर्मचारी हे नियमित वेळेत उपस्थित राहतील, शिस्त राखली जाईल, गैरप्रकारांना आळा बसेल आणि रुग्णसेवेवर सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
काही महिन्यापूर्वी कणकवलीत काही युवकांमध्ये मारहाण होत त्यातील एका युवकाने दुसऱ्या युवकावर कट्टर ने हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी झाल्याने युवकाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्या युवकाच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. त्यावेळी त्या नातेवाईकांनी पोलिस व तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. यानंतर या घटने संदर्भात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा संवेदनशील घटनांच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ठोस पुरावे उपलब्ध होत नाहीत, ज्यामुळे तपासात अडथळे येतात.
याकडे जिल्हा शल्यचिकित्सक, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित पुढारी मंडळींनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे.