वाहनांची केली जातेय कसून तपासणी
कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी स्थिर नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकांमार्फत सीमावर्ती भागातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेवर काटेकोर नजर ठेवली जात आहे. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार, आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध मद्य, रोख रक्कम किंवा अन्य प्रतिबंधित साहित्याची वाहतूक होऊ नये, यासाठी ही उपाययोजना राबविण्यात आली आहे.
तपासणी दरम्यान संशयास्पद वाहनांची सखोल चौकशी करण्यात येत असून आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणीही केली जात आहे. प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या या कारवाईमुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पडण्यासाठी मदत होणार आहे. नागरिकांनी तपासणी दरम्यान प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.