-0.4 C
New York
Saturday, January 17, 2026

Buy now

हृदयस्पर्शी क्षण ! फुटपाथवर भाजी विकणाऱ्या आईला मुलाने दिली देशसेवेची आनंदवार्ता

कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी येथील शेटकरवाडीमधील गोपाळ सत्यवान सावंत यांची सी.आर.पी.एफ. ( केंद्रीय राखीव पोलीस दल ) मध्ये देशसेवेसाठी निवड झाली असून, ही केवळ एका तरुणाची यशोगाथा नसून संघर्षातून उभ्या राहिलेल्या स्वप्नाची साकार कथा ठरत आहे.

कुडाळ नगरपंचायत परिसरात फुटपाथवर भाजी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आपल्या आई अनुराधा सावंत यांना गोपाळ यांनी सीआरपीएफ निवडीची आनंदवार्ता दिल्याचा हृदयाला स्पर्श करून जाणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आईच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद, डोळ्यातील अश्रू आणि मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीत वाढलेले गोपाळ सावंत यांनी शिक्षणासोबतच शारीरिक मेहनत, नियमित व्यायाम, कठोर शिस्त आणि अपार संयम या जोरावर सीआरपीएफसारख्या प्रतिष्ठित दलात स्थान मिळवले.

घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही त्यांनी कधीही परिस्थितीला दोष न देता स्वप्नांवर विश्वास ठेवत सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. वडील आजारी असतात त्यामुळे घरची जबाबदारी आईवर असते. आई रस्त्यावर भाजी विकत असताना अनेकदा मदतीचा हात देत, कुटुंबाची जबाबदारी पेलत असतानाच गोपाळ यांनी देश सेवेचे ध्येय मनाशी घट्ट धरले होते. त्यांचे हे यश हे मेहनतीला कधीच पर्याय नसतो याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

गोपाळ सावंत याने पहिल्यांदा अग्निविर भरतीसाठी प्रयत्न केले. पोलीस भरतीचीही तयारी केली , मात्र त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. अखेर गोपाळने सीआरपीएफ भरती यश मिळवले आहे. या घटनेतून आजच्या तरुण पिढीला एक महत्त्वाचा संदेश मिळतो की, गरिबी, अडचणी किंवा अपयश ही यशाची अडथळे नसून तीच खरी शाळा असते. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही. गोपाळ सावंत यांच्या सीआरपीएफमधील निवडीबद्दल कुडाळ तालुका तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक तरुणांसाठी ते आज प्रेरणास्थान ठरत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!