-0.4 C
New York
Saturday, January 17, 2026

Buy now

महायुतीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुतीतच लढवण्याचा निर्णय

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची माहिती

कणकवली : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांनी दिली.

कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, माजी आ. प्रमोद जठार, माजी आ. अजित गोगटे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावर, काका कुडाळकर, संजू परब आदी उपस्थित होते.

खासदार नारायण राणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुतीची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई महानगर पालिका निकालानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून विरोधकांचा धुव्वा उडवला जाईल असा इशाराही खा. नारायण राणे यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले, महायुती सरकारच्या कार्यकाळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सर्वांगीण पूर्तता करण्यात आली असून, चिपी विमानतळाची विमानसेवा आता पूर्णपणे सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीतपणे कार्यरत असून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले असून या विकासात विरोधकांचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळे जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप आणि शिवसेनेलाच आहे, असा ठाम दावा खासदार नारायण राणे यांनी केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला आज किंवा उद्या जाहीर करण्यात येणार असून, प्रचाराचा अधिकृत शुभारंभ शनिवारी सायंकाळपासून होणार आहे. आगामी निवडणुकीत महायुती शंभर टक्के विजय मिळवेल, असा विश्वास देखील खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.

दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, महायुतीची निवडणूकविषयक बैठक पार पडली असून जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!