रुग्णांनी शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा ; दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार – डॉ. विशाल रेड्डी
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे व सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील आवश्यक सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने तातडीने निर्णय घेत उपजिल्हा रुग्णालयात विविध सुधारणा राबविण्यात आल्या असून सध्या रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना उत्तम उपचार मिळत असून काही त्रुटी असल्यास त्या तात्काळ दूर करून सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘दि स्पाईन फाऊंडेशन’ च्या माध्यमातून आतापर्यंत ९ रुग्णांवर ११ मणक्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचा शासकीय उपजिल्हा रुग्णालयावरील विश्वास अधिक दृढ झाला असून याचे प्रत्यंतर सध्या उपचारासाठी होणाऱ्या वाढत्या गर्दीतून दिसून येत आहे.
दरम्यान, याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, कोणत्याही रुग्णाला उपचारांबाबत अडचण असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. रुग्णसेवेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन, एक्स-रे मशीन तसेच सिटी स्कॅन सेवा सध्या सुरळीत सुरू असून दर गुरुवारी सोनोग्राफी तपासणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. याशिवाय नवीन एक्स-रे मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे.
अलीकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी अचानक रुग्णालयास भेट दिली असता स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करत रुग्णालय परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.
पुढे बोलताना डॉ. रेड्डी म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाशी संबंधित जे काही प्रश्न होते, त्यांची स्वतः पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. पालकमंत्री नाम. नितेश राणे तसेच आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने उर्वरित समस्या देखील लवकरच सोडविल्या जातील. ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही. मी स्वतः ओपीडीमध्ये उपस्थित राहणार असून रुग्णांबाबत दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे.
सध्या उपजिल्हा रुग्णालयात सर्व डॉक्टर वेळेत उपस्थित असून वॉर्डमध्ये दाखल असलेल्या गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. आर्थोपेडिक विभागात डॉ. धनंजय रासम, डॉ. सर्वेश तायशेटे व डॉ. सचिन डोंगरे कार्यरत असून फिजिशियन सेवा स्वतः डॉ. रेड्डी देत आहेत.
स्त्रीरोग तज्ज्ञ पद जून महिन्यापासून रिक्त असून ते भरण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच शहरातील खाजगी स्त्रीरोगतज्ज्ञांनाही याबाबत कळविण्यात आले आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मणक्यांच्या आजारांसाठी नियमित शिबिरे आयोजित केली जात असून स्पाईनचे रुग्ण असल्यास त्यांनी आगामी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. रेड्डी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मणका व हाडांचे गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेने हर्निया शस्त्रक्रियेबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेत संबंधित डॉक्टरवर चौकशी करून कारवाई केली जाईल, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले. त्या महिला रुग्णाशी थेट संपर्क साधून योग्य उपचार देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
विशेष म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात त्या फेसबुक पोस्टची खातरजमा करून संबंधित महिलेला उपजिल्हा रुग्णालयात येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तातडीने तपासणी करून लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येईल, असा विश्वास डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केला.
यावेळी संबंधित महिला रुग्णाने वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी व संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले.