कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली तालुका विधी सेवा समितीच्या पुढाकारातून सामाजिक जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. कणकवली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी शुभम लटूरिया यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ५, कणकवली येथील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना मलये, उपशिक्षिका शर्मिला चव्हाण तसेच कणकवली न्यायालयातील वरिष्ठ लिपिक आचार्य यांच्या सहकार्याने ही रॅली यशस्वीपणे पार पडली.
हुंडाबळी, जातीभेद, स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या समाजाला घातक ठरणाऱ्या प्रथांविरोधात जनजागृती करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी हातात आकर्षक बॅनर्स व घोषवाक्ये घेत शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत नागरिकांमध्ये सामाजिक जागरूकतेचा ठाम संदेश दिला.
बालमनातून उमटलेला परिवर्तनाचा आवाज
रॅलीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांचे विशेष लक्ष या लहानग्या विद्यार्थ्यांकडे वेधले गेले. निरागस बालमनातून उमटलेला सामाजिक परिवर्तनाचा आवाज उपस्थितांना अंतर्मुख करणारा ठरला. स्त्रीसमानता, सामाजिक समता आणि मानवी मूल्यांची जपणूक व्हावी, यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
कणकवली तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून भविष्यातही समाजप्रबोधनासाठी अशा विविध जागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.