कणकवली : संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीनंतर अखेर कणकवलीचा नगराध्यक्ष कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. २० डिसेंबर रोजी स्पष्ट झालेल्या निकालानंतर सोमवारी संदेश पारकर यांनी कणकवलीच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृतरित्या पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी संदेश पारकर यांनी परमपूज्य भालचंद्र महाराज तसेच श्री देव स्वयंभू यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते नगरपंचायत कार्यालयात दाखल झाले. अनेक वर्षांनंतर हा मान मिळाल्याने कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
नगरपंचायत कार्यालय परिसरात फुलांची पुष्पवृष्टी, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पारकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
नव्या नेतृत्वाकडून कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.